पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब
पिंपरी-चिंचवड शहरात मनाई आदेशाचे उल्लंघन करत बेकायदेशीररीत्या शस्त्र बाळगणाऱ्या एका तरुणाला सांगवी पोलिसांनी पहाटेच्या सापळ्यात पकडले. आरोपीकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतूस जप्त करण्यात आले असून, परिसरात या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई ३० एप्रिल २०२६ रोजी पहाटे ३.४५ ते ४.२० वाजण्याच्या दरम्यान औंध जिल्हा रुग्णालयाजवळील पॉवर हाऊस परिसर, जुनी सांगवी येथे करण्यात आली. या प्रकरणी सकाळी ५ वाजता सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या प्रकरणी आरोपी अर्थव सोपान मारणे (वय १९, रा. आंबेगाव पठार, कात्रज, पुणे) याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी केलेल्या तपासणीदरम्यान आरोपीच्या ताब्यातून सुमारे ५१ हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले.
महत्वाचे म्हणजे, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने लागू केलेल्या मनाई आदेशानुसार घातक शस्त्रे जवळ बाळगण्यास स्पष्ट बंदी असताना आरोपीने हा आदेश धाब्यावर बसवत बेकायदेशीर शस्त्र जवळ ठेवले होते. त्यामुळे आरोपीविरोधात भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलीस हवालदार आशिष बनकर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भालेराव करत आहेत. शहरात बेकायदेशीर शस्त्रधारकांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.




