spot_img
spot_img
spot_img

चरोली फाटा येथे प्रतिबंधित पानमसाला विक्रीवर धाड; दुकानदार अटकेत

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब

पिंपरी-चिंचवड शहरात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची खुलेआम विक्री सुरू असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. दिघी परिसरातील चरोली फाटा येथे अन्न व औषध प्रशासन विभागाने केलेल्या धाडीत विविध कंपन्यांचे प्रतिबंधित पानमसाले व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला असून, संबंधित दुकानदाराला अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई २९ एप्रिल २०२६ रोजी दुपारी सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास धर्मवीर चौक, चरोली फाटा येथील सुदामा पान शॉप येथे करण्यात आली. अन्न सुरक्षा अधिकारी अक्षय शेळके यांच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पंचांच्या उपस्थितीत ही धाड टाकण्यात आली.

या प्रकरणी आरोपी दत्तात्रय बन्सी काळे (वय ५५, रा. चोली फाटा, आळंदी रोड, पुणे) याला अटक करण्यात आली आहे. तपासादरम्यान आरोपीच्या दुकानात राजनिवास, डायरेक्टर स्पेशल, आर.एम.डी., विमल पान मसाला, शॉट ९९९ लक्झरी चिविंग टोबॅको, वी-१, एम गोल्ड, जाफराणी जर्दा यांसारख्या प्रतिबंधित अन्नपदार्थांचा मोठा साठा विक्रीसाठी ठेवलेला आढळून आला.

महाराष्ट्रात तंबाखूयुक्त पानमसाला विक्रीवर बंदी असतानाही आरोपी बेकायदेशीररीत्या विक्री व साठा करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिघी पोलीस ठाण्यात ३० एप्रिल रोजी पहाटे ५.२४ वाजता गुन्हा नोंद करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करत आहेत. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!