spot_img
spot_img
spot_img

“१० दिवसांत दुप्पट परतावा” चे आमिष; निगडीत २२.५० लाखांची फसवणूक – आरोपी अटकेत

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब

पिंपरी-चिंचवड शहरात गुंतवणुकीवर अल्पावधीत दुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून एका महिलेला तब्बल २२ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी निगडी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, त्याच्याविरोधात गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निगडी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यानुसार, ही घटना ६ फेब्रुवारी २०२६ ते ७ एप्रिल २०२६ या कालावधीत सेक्टर क्रमांक २६, प्राधिकरण निगडी येथील आयकर कर्मचारी निवास परिसरात घडली. याप्रकरणी ३० एप्रिल रोजी सायंकाळी ७.३३ वाजता गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कुणाल काशिनाथ साबळे (वय ३६, रा. जुनी सांगवी, पुणे) याने स्वतःच्या व कुटुंबीयांच्या नावावर तीन कंपन्या असल्याचे भासवून फिर्यादी महिलेला बनावट कागदपत्रे दाखवली. त्याने “गुंतवणूक केल्यास केवळ १० दिवसांत दुप्पट रक्कम परत मिळेल” असे आमिष दाखवून विश्वास संपादन केला.

आरोपीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून फिर्यादीने वेळोवेळी त्याच्या बँक खात्यात एकूण २२ लाख ५० हजार रुपये ट्रान्सफर केले. यानंतर आरोपीने विश्वास वाढवण्यासाठी २५ लाख रुपयांचा धनादेशही दिला होता. मात्र, ठरलेल्या मुदतीनंतर रक्कम परत न मिळाल्याने फिर्यादीने संबंधित धनादेश बँकेत जमा केला असता, खात्यात पुरेशी शिल्लक नसल्याने तो धनादेश बाऊन्स झाला.

यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिर्के करत असून, अशा प्रकारच्या गुंतवणूक योजनांपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!