पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी – युनूस खतीब
पिंपरी-चिंचवड शहरात लागू असलेल्या शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन करत अवैधरित्या देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या एका तरुणाला चिखली पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. ३० एप्रिल २०२६) पहाटे करण्यात आली.
चिखली पोलिस ठाण्याच्या हद्दीत श्रीराम हौसिंग सोसायटी परिसरात, ओम इंजिनियर्स कंपनीजवळ, म्हेत्रे गार्डन समोर, म्हेत्रेवस्ती येथे रात्री सुमारे १.३० वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. पोलिस हवालदार किरण बबन काटकर (बकल नं. ८७१) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव विश्वजीत सर्जेराव मंडले (वय २६, रा. साने चौक, चिंचेचा मळा, नामदेव कॉलनी, मोरेवस्ती, चिखली, पुणे) असे आहे. आरोपी मूळचा सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील असून, त्याच्याकडून अंदाजे ३१ हजार रुपये किंमतीचे देशी बनावटीचे पिस्टल, एक मॅगझीन आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड शहरात मा. पोलीस आयुक्तांनी २९ एप्रिल २०२६ पासून १२ मे २०२६ पर्यंत शस्त्रबंदी आदेश लागू केला आहे. या आदेशानुसार कोणतेही शस्त्र, अस्त्र किंवा इजा पोहोचवणारी साधने बाळगण्यास सक्त मनाई आहे. असे असतानाही आरोपीने हा आदेश धुडकावून लावत बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगले होते.
या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१)(३) सह १३५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपीस अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
पोलिसांचा इशारा:
शहरात लागू असलेल्या शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.




