शबनम न्यूज | प्रतिनिधी
‘राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा’ ही केवळ ओळ नाही, तर महाराष्ट्राच्या जिद्दीची, संघर्षशीलतेची आणि आत्मविश्वासाची ओळख आहे. या भूमीने प्रतिकूलतेतही उभे राहण्याची तसेच विकास घडवण्याची प्रेरणा दिली. आज महाराष्ट्राच्या स्थापना दिनानिमित्त, आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त तसेच मराठी राजभाषा दिनानिमित्त आपण या समृद्ध परंपरेला वंदन करत असताना, कष्टकरी हातांच्या योगदानाबरोबरच आपल्या मराठी भाषेच्या अभिमानाची जाणीव अधिक दृढ होते. हीच भाषा आपल्या संस्कृतीची ओळख, विचारांची ताकद आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा कणा आहे, असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६७ वा वर्धापन दिन तसेच कामगार दिन आणि मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनाच्या प्रांगणात महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते ध्वजारोहन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी शहरवासीयांना महाराष्ट्र दिन, कामगार दिन तसेच मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा देताना ते बोलत होते.
यावेळी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, उपमहापौर शर्मिला बाबर यांच्यासह नगरसदस्य डॉ. सुहास कांबळे, निलेश तरस, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, सह आयुक्त मनोज लोणकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, सह शहर अभियंता सुनील बागवानी, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी विजय बोरुडे, उप आयुक्त पंकज पाटील, संदीप खोत, अण्णा बोदडे, ममता शिंदे, प्रदीप ठेंगल, व्यंकटेश दुर्वास, चेतना केरुरे,अतुल पाटील,सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे, क्षेत्रीय अधिकारी राजाराम सरगर, कार्यकारी अभियंता सुनील पवार, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे विशेष अधिकारी किरण गायकवाड, अग्निशमन अधिकारी ऋषिकांत चिपाडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल तसेच नागरिक उपस्थित होते.
महापौर रवि लांडगे म्हणाले, पिंपरी चिंचवड ही केवळ शहर नाही, तर ते भक्ती-शक्ती, पराक्रम आणि श्रम यांच्या संगमातून घडलेली ओळख आहे. भक्ती शक्ती समूहशिल्पातून प्रकट होणारी प्रेरणा, मोरया गोसावींच्या पावन स्मृती, तसेच संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी तसेच चिंचवड येथील चापेकर बंधूंचे स्मारक आणि त्यांचा ऐतिहासिक वाडा हा स्वातंत्र्यलढ्यातील त्याग, शौर्य आणि क्रांतीची जाज्वल्य साक्ष आहे. हजारो कामगारांच्या कष्टातून उभी राहिलेली औद्योगिक नगरी ही या शहराची खरी ताकद आहे, जिथे प्रत्येक कारखान्यात आणि प्रत्येक कष्टकरी हातात महाराष्ट्राच्या प्रगतीची धडधड जाणवते.
या समृद्ध परंपरेचा वारसा जपत, पिंपरी चिंचवड शहराला अधिक सक्षम, समृद्ध आणि सर्वसमावेशक बनवण्याचा आपला संकल्प अधिक दृढ आहे. कामगारांच्या कष्टाला सन्मान देत, विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर सामान्य नागरिक केंद्रस्थानी ठेवून पुढे जाणे, हाच खरा महाराष्ट्राच्या स्थापनेचा आणि या भूमीच्या विचारांचा सन्मान ठरेल, असे देखील महापौर रवि लांडगे यावेळी म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.
महाराष्ट्र दिनी जनगणना २०२७ साठी एलईडी व्हॅनद्वारे जनजागृती मोहिमेचा शुभारंभ
जनगणना २०२७ प्रक्रियेबाबत नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती व्हावी यासाठी एलईडी व्हॅनद्वारे प्रचार प्रसिद्धी मोहिमेचा शुभारंभ आज महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचे औचित्य साधून महापौर रवि लांडगे तसेच आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आला. या उपक्रमाद्वारे शहरातील विविध भागांत फिरून नागरिकांना जनगणनेच्या स्वयं नोंदणी प्रक्रियेची सविस्तर माहिती देण्यात येणार असून, जास्तीत जास्त नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.




