शबनम न्यूज | प्रतिनिधी
महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त भोसरी एमआयडीसी येथे दुर्गा ब्रिगेड राष्ट्रीय पक्षातर्फे उत्साहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात गुणवंत कामगारांचा सन्मान इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर, उपाध्यक्ष शिवाजीराव पाटील, उपाध्यक्ष वैभव जगताप तसेच दुर्गा ब्रिगेड राष्ट्रीय पक्षाच्या अध्यक्षा दुर्गा भोर यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे नियोजन दुर्गा ब्रिगेडच्या उपाध्यक्ष जयश्री साळुंखे, राहिसा पठाण तसेच गीता गाढवे, आकाश बनसोडे, शांतीलाल डांगी, अमोल चव्हाण, गौरव जोशी, कविता कंकाळ यांनी केले.
या सन्मान सोहळ्यात गॅरेज मेकॅनिक, टाटा मोटर्स कंपनीतील आणि एमआयडीसीतील कामगार तसेच विविध क्षेत्रातील कामगार वर्गाचा समावेश होता. सन्मानित कामगारांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील मान्यवरांचे अभिवादन करून त्यांच्या योगदानाला मानाचा मुजरा करण्यात आला. तसेच, इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांचे वडील व दुर्गा भोर यांचे आजोबा स्वर्गीय सोपानराव भोर यांचा संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सक्रिय सहभाग होता. त्यांच्या १९५६ सालच्या लढ्याच्या पिंपरी चिंचवडचे माजी नगरसेवक सोपानराव भोर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रतिमेला या ठिकाणी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी आपल्या भाषणात सांगितले की,
“महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी प्रत्येक नागरिकाचे योगदान महत्त्वाचे आहे. यासाठी कोणतेही राजकीय पद असणे आवश्यक नाही. एक जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येकाने पुढाकार घेतला पाहिजे. कार्य करण्यासाठी पदाची नव्हे तर इच्छाशक्तीची गरज असते. महाराष्ट्र हे असे राज्य आहे की, जिथे देशातील प्रत्येक भागातून आलेल्या व्यक्तींना सामावून घेतले जाते आणि त्यांना रोजगाराच्या संधी दिल्या जातात.”
कार्यक्रमाच्या शेवटी दुर्गा ब्रिगेड राष्ट्रीय पक्षाच्या अध्यक्षा दुर्गा भोर यांनी उपस्थित सर्व मान्यवर व कामगार बांधवांचे आभार मानले. तसेच, दुर्गा ब्रिगेड पक्षातर्फे पुढील काळात महाराष्ट्रभर विविध शाखांमार्फत महिला व तरुणींना सक्षम करण्यासाठी ठोस पुढाकार घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच, उपस्थित कामगार बांधवांमध्ये पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला. कार्यक्रमास पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने कामगार बांधव उपस्थित होते.




