शबनम न्यूज | प्रतिनिधी
त्याग, संघर्ष आणि समर्पणाच्या असामान्य जीवनप्रवासाला रंगमंचावरून सजीव रूप देणारा ‘मी रमाई’ हा एकपात्री नाट्यप्रयोग पिंपरी चिंचवडकरांसाठी एक हृदयस्पर्शी आणि विचारप्रवर्तक अनुभव ठरला. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पिंपरी येथे उभारण्यात येणाऱ्या ‘त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर सृष्टी’ प्रकल्पाच्या भूमिपूजन कार्यक्रमाचे औचित्य साधून सायंकाळी मराठी अभिनेत्री प्रियांका उबाळे यांच्या प्रभावी सादरीकरणातून रमाईंच्या जीवनातील अदृश्य पण महान संघर्ष प्रेक्षकांसमोर उलगडला.
पिंपरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक (भीमसृष्टी) जवळील मोकळ्या जागेत आयोजित या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रस्तावित सृष्टी प्रकल्पाच्या माध्यमातून रमाईंच्या कार्याची आणि त्यागाची स्मृती जपण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न होत असताना, ‘मी रमाई’ या नाट्यप्रयोगाने त्या संकल्पनेला भावनिक अधोरेखित केले.
या एकपात्री नाट्यप्रयोगामध्ये रमाईंच्या आयुष्याचा संपूर्ण पट अत्यंत प्रभावी शैलीत मांडण्यात आला. लहानपणातील गरिबी, शिक्षणाचा अभाव आणि बालवयात आलेल्या जबाबदाऱ्या यांचे चित्रण करताना समाजातील कठोर वास्तवाची जाणीव प्रेक्षकांना झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी विवाहानंतरच्या कठीण आयुष्याचा प्रवास, आर्थिक संकटे आणि संसारातील संघर्ष यांचे वास्तववादी सादरीकरण मन हेलावून टाकणारे होते.
नाट्यप्रयोगातील सर्वाधिक परिणामकारक भाग म्हणजे रमाईंच्या त्यागाची जाणीव करून देणारे प्रसंग. डॉ. बाबासाहेब परदेशात शिक्षण घेत असताना रमाईंची एकटेपणाशी चाललेली झुंज, मुलांच्या मृत्यूचे दु:ख सहन करतानाही न डगमगणारी मानसिक ताकद आणि “तुम्ही शिकत राहा, मी सगळं सहन करते” हा तिचा निश्चय प्रेक्षकांना अंतर्मुख करणारा ठरला.
याचबरोबर समाजातील अस्पृश्यतेचे अनुभव, बाबासाहेबांच्या सामाजिक चळवळीत रमाईंची अप्रत्यक्ष पण अत्यंत महत्त्वाची साथ यांचे प्रभावी चित्रण या प्रयोगात करण्यात आले. आपल्या वैयक्तिक वेदना बाजूला ठेवून समाजासाठी कार्य करणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दिलेले मानसिक बळ हे रमाईंच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य अधोरेखित करणारे ठरले.
नाट्यप्रयोगाच्या शेवटी रमाईंच्या आजारपणाचा आणि त्यांच्या जीवनाच्या अखेरच्या टप्प्याचा भावनिक आविष्कार सादर करताना प्रेक्षक स्तब्ध झाले होते. “महापुरुष घडवणारी शक्ती कोण?” हा प्रश्न उपस्थित करत समाजातील स्त्रियांच्या अदृश्य योगदानाची जाणीव करून देणारा संदेश या प्रयोगातून देण्यात आला.
प्रियांका उबाळे यांनी एकहाती साकारलेला हा नाट्यप्रयोग प्रेक्षकांना केवळ भावनिक पातळीवर स्पर्श करून गेला नाही, तर सामाजिक भानही अधिक तीव्र करून गेला. प्रस्तावित ‘रमाई सृष्टी’ प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर हा प्रयोग आयोजित करून महानगरपालिकेने इतिहासातील एका महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्त्वाच्या योगदानाला उजाळा देण्यात आला.
या नाट्यप्रयोगास नगरसदस्य डॉ. सुहास कांबळे, उप आयुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या माध्यमातून रमाईंच्या त्यागमय जीवनाची प्रेरणा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न यशस्वी ठरला.




