पिंपरी चिंचवड प्रतिनिधी – युनूस खतीब
निगडी परिसरात जुन्या वादातून एका तरुणावर धारदार हत्याराने जीवघेणा हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. दत्त मंदिराजवळ, निगडी बस स्टॉप परिसरात २७ एप्रिल रोजी रात्री सुमारे ८.४५ वाजता हा प्रकार घडला.
या प्रकरणी अथर्व गणेश शिंदे (वय २०, रिक्षाचालक, रा. निगडी) यांनी फिर्याद दिली असून निगडी पोलिसांनी गणेश लोणकर, आकाश खिरडे, विकास खिरडे आणि निहाल यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यापैकी गणेश लोणकर व निहाल यांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून आरोपींनी फिर्यादीवर हल्ला केला. आरोपींनी फिर्यादीला पकडून ठेवत गणेश लोणकर याने धारदार शस्त्राने गाल, हनुवटी, गळा आणि हातावर वार करून त्याला गंभीर जखमी केले. तसेच “मध्ये पडला तर तुम्हालाही मारू” अशी धमकी देत परिसरात दहशत निर्माण केली.
या घटनेप्रकरणी भारतीय न्याय संहिता तसेच अन्य कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.




Total Users : 228019