शबनम न्यूज | प्रतिनिधी
अनुसूचित जातींमध्ये अ.ब.क.ड. उपवर्गीकरणाची अंमलबजावणी तातडीने करावी या प्रमुख मागणीसाठी शहरात भव्य निदर्शने आंदोलन आयोजित करण्यात आले. निगडी तहसीलदार कार्यालय येथे पार पडलेल्या या आंदोलनात मातंग समाजासह विविध पोटजातींच्या नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
या आंदोलनात शहरातील विविध सामाजिक संघटना, कार्यकर्ते तसेच लहुजी वस्ताद साळवे विचार प्रबोधन पर्व आणि डॉ. अण्णा भाऊ साठे प्रबोधन पर्वचे आजी-माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
आजी-माजी नगरसेवक आणि विविध समाजबांधवांनीही आंदोलनाला पाठिंबा दर्शवला.
आंदोलनादरम्यान अ.ब.क.ड. उपवर्गीकरणाच्या अंमलबजावणीसह मातंग समाज व इतर पोटजातींच्या प्रलंबित प्रश्नांवर ठोस भूमिका मांडण्यात आली. सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक न्याय मिळावा, यासाठी शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी जोरदार मागणी करण्यात आली.
यानंतर शिष्टमंडळाच्या वतीने अपर तहसीलदारांना सामूहिक निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनाद्वारे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. या आंदोलनाचे नेतृत्व आमदार अमित गोरखे यांनी केले. त्यांच्यासह भाऊसाहेब अडागळे, मारुती जाधव, संदिपान झोंबाडे, बाबासाहेब रसाळ, नितीन घोलप, अरुण जोगदंड, संजय ससाने आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच विविध समाजातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
दरम्यान, शासनाने या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास भविष्यात अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला.




