शबनम न्यूज | प्रतिनिधी
भारतीय संगीत क्षेत्रातील देदीप्यमान नक्षत्र आणि गानसम्राज्ञी आशा भोसले यांच्या जादुई स्वरांना मानवंदना देण्यासाठी पिंपरी चिंचवडमध्ये ‘सूर आशा – A Tribute to Asha Bhosle’ या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाद्वारे आशा भोसले यांना सांगीतिक श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. गुरुवार, दि. ३० एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५ ते ८ या वेळेत चिंचवड येथील प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात ही स्वराजंली संपन्न होणार आहे.
हा कार्यक्रम मोरया थियएर्स निर्मित असून नियोजन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखा, पिंपरी चिंचवड कलारंग प्रतिष्ठान, सिद्धिविनायक ग्रुप आणि कोहिनूर ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास पिंपरी चिंचवडचे महापौर रवी लांडगे आणि महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
या कार्यक्रमाची संकल्पना आणि प्रस्तुती अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद (मध्यवर्ती) चे उपाध्यक्ष तथा पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर. व अ.भा. मराठी नाट्य परिषदेचे (पिं. चिं. शाखा) कार्याध्यक्ष राजेशकुमार सांकला आणि उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांची आहे.
आशाजींच्या अजरामर गीतांचा वारसा सांगणाऱ्या या कार्यक्रमास कोमल कृष्णा, राधिका अत्रे, मानसी भोईर घुले, हिम्मत कुमार पंड्या आणि प्रशांत साळवी हे नामवंत गायक आपली कला सादर करतील. त्यांना चिंतन मोडा, हार्दिक रावल, विजू मूर्ती, सईद खान, असिफ खान आणि अभिजित भिडे यांसारख्या अनुभवी वादयवृंदांची साथ लाभणार आहे. डॉ. अमित त्रिभुवन या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार असून, तांत्रिक बाजूंची धुरा ‘म्युझिक व्हिजन’, ‘विजय चेन्नूर’ आणि ‘विक्रम क्रिएशन’ सांभाळणार आहेत.
हा कार्यक्रम रसिकांसाठी पूर्णतः विनामूल्य असून, प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर प्रवेश दिला जाईल. कार्यक्रमाच्या विनामूल्य प्रवेशिका मिळवण्यासाठी इच्छुकांनी राजू बंग (९८२२३१३०६६) किंवा प्रशांत साळवी (७८७५४५८५५५) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संयोजक भाऊसाहेब भोईर व सहकाऱ्यांनी केले आहे.




