शबनम न्यूज | प्रतिनिधी
शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने मुंबई येथील देवगिरी निवासस्थान येथे पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि राज्यसभा खासदार पार्थ पवार यांची भेट घेतली. या भेटीत आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहराला प्रतिनिधित्व मिळावे, यासाठी एकमताने शहराध्यक्ष तथा माजी महापौर योगेश बहल यांचे नाव पुढे करण्यात आले. यासंदर्भात शिष्टमंडळाने सविस्तर निवेदन सादर केले.
निवेदनात म्हटले आहे की, योगेश बहल यांनी 1992 पासून सात वेळा निवडून येत शहरात एक अभ्यासू आणि कार्यक्षम लोकप्रतिनिधी म्हणून ओळख निर्माण केली आहे. त्यांनी महापौर, सभागृह नेते, स्थायी समिती अध्यक्ष तसेच शहराध्यक्ष अशा विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. शहरातील सामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर त्यांनी सातत्याने काम केले असून पक्ष संघटना बळकट करण्यातही मोलाचे योगदान दिले आहे.

तसेच, पिंपरी-चिंचवड शहराला आजतागायत विधान परिषदेमध्ये प्रतिनिधित्व मिळालेले नाही. पिंपरी विधानसभा मतदारसंघ अनेक वर्षांपासून आरक्षित असल्यामुळे बहल यांना संधी मिळू शकलेली नाही. त्यामुळे त्यांच्या दीर्घ राजकीय कारकिर्दीचा विचार करून विधान परिषदेच्या माध्यमातून त्यांना न्याय मिळावा, अशी मागणी करण्यात आली.
निवेदनात पुढे नमूद करण्यात आले की, शहरात तीन विधानसभा मतदारसंघ असून त्यापैकी केवळ एकच आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे. शहरातील विकासकामांना गती देण्यासाठी आणि प्रशासनाशी समन्वय साधण्यासाठी विधान परिषदेतून शहराला प्रतिनिधित्व मिळणे गरजेचे आहे. योगेश बहल यांना संधी दिल्यास शहराच्या विकासाला चालना मिळेल आणि पक्ष संघटनाही अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
औद्योगिक नगरी आणि आयटी हब म्हणून ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवडसारख्या कॉस्मोपॉलिटन शहरात बहल यांसारख्या अनुभवी व अल्पसंख्याक समाजातील नेत्याला संधी दिल्यास सकारात्मक संदेश जाईल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या शिष्टमंडळात डॉ. वैशाली घोडेकर, हिरानंद (डब्बू) आसवाणी, पंडित गवळी, शाम लांडे, सीमा सावळे, वैशाली काळभोर, अतुल शितोळे, जितेंद्र ननावरे, फजल शेख, संतोष बारणे, राजेंद्र जगताप, प्रकाश सोमवंशी, निकिता कदम, विकास साने, राजू बनसोडे, शेखर चिंचवडे, वर्षा जगताप, मनिषा लांडे, उज्वला ढोरे, प्रियंका कुदळे, अरुणा लंगोटे, अश्विनी वाबळे, सारिका मासुळकर, प्रतिक्षा जवळकर-लांघी, दिप्ती कांबळे, ज्ञानेश्वर कांबळे, सारंग कामतेकर, तानाजी खाडे, ज्ञानेश्वर (माऊली) मोरे, रविंद्र ओव्हाळ, युसूफ कुरेशी, दिपक साकोरे, राजू लोखंडे, निलेश शिंदे, अंबरनाथ कांबळे, गणेश लंगोटे, मंगेश बारणे, हबीब शेख, सचिन बारणे आदींसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, या मागणीवर पक्ष नेतृत्व काय निर्णय घेते, याकडे पिंपरी-चिंचवडमधील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.




