शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या स्मरणार्थ भव्य सृष्टी उभारण्यात येणार आहे. पिंपरी येथील भीमसृष्टी परिसरातील मोकळ्या जागेत ही सृष्टी साकारली जाणार असून या प्रकल्पाचे भूमिपूजन मंगळवार, २८ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ वाजता महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते होणार आहे.
या कार्यक्रमास केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची विशेष उपस्थिती असणार आहे. तसेच राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. याशिवाय विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, खासदार सुप्रिया सुळे, श्रीरंग आप्पा बारणे, डॉ. अमोल कोल्हे, आमदार महेश लांडगे, शंकर जगताप यांची सन्माननीय उपस्थिती असणार आहे. तर आमदार उमा खापरे, अमित गोरखे, शंकर मांडेकर, महापालिकेच्या उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. याशिवाय प्रमुख अतिथी म्हणून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉ.भीमराव आंबेडकर यांची देखील उपस्थिती असणार आहे.
यांच्यासह महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग सदस्य अँड. गोरक्ष लोखंडे, शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे, विधी समिती सभापती सुजाता बोराटे, शहर सुधारणा समिती सभापती संजय काटे, महिला व बालकल्याण समिती सभापती राणी माई पठारे, शिक्षण समिती सभापती रविना आंगोळकर तसेच क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती कैलास कुटे तसेच नगरसदस्य सिद्धार्थ बनसोडे, राहुल भोसले, कुशाग्र कदम, तुषार हिंगे, नगरसदस्या अनुराधा गोरखे, सुप्रिया चांदगुडे, डॉ. वैशाली घोडेकर (लोंढे), सारिका मासुळकर, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे तसेच नगरसदस्य, नगरसदस्या व अधिकारी हे देखील या कार्यक्रमास उपस्थित असणार आहेत.
पिंपरी चौक येथे नियोजित त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर सृष्टी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी २४ महिन्यांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. सुमारे २४९८.९७ चौरस मीटर क्षेत्रावर ही सृष्टी उभारली जाणार आहे. या प्रकल्पांतर्गत सृष्टीला आकर्षक व दर्जेदार स्वरूप देण्यात येणार आहे. यासाठी मजबूत आरसीसी स्ट्रक्चर उभारले जाणार असून, म्युरल्ससाठी स्वतंत्र भिंती आणि आकर्षक जीआरसी काम करण्यात येणार आहे. माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठी सुबक चौथरा व प्रतीक्षालय तसेच स्मारक परिसरात स्वतंत्र जिन्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे.
परिसराचे सौंदर्य वाढविण्यासाठी आकर्षक प्रवेश कमान, सुबक पादचारी मार्ग, लँडस्केप गार्डन आणि कारंज्यांची निर्मिती करण्यात येणार आहे. यासोबतच आधुनिक विद्युत रोषणाईद्वारे परिसर उजळविण्यात येणार आहे. नागरिकांच्या सोयीसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, दिव्यांगांसाठी रॅम्प व लिफ्ट तसेच बसण्याची व्यवस्था उपलब्ध करून दिली जाणार आहे.
तंत्रज्ञानाचा वापर करत या सृष्टीमध्ये डिजिटल सुविधांचाही समावेश करण्यात येणार आहे. क्युआर कोडच्या माध्यमातून माता रमाई आंबेडकर यांच्या जीवनकार्याची माहिती मिळेल, तर बहुभाषिक ऑडिओ प्रणालीद्वारे नागरिकांना अधिक समृद्ध अनुभव घेता येणार आहे.
तरी या भूमिपूजन समारंभास पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून माता रमाई आंबेडकर यांच्या प्रेरणादायी जीवनकार्याला अभिवादन करावे तसेच या ऐतिहासिक प्रकल्पाचा साक्षीदार होण्याच्या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
माता रमाई आंबेडकर यांच्या त्याग, संघर्ष आणि प्रेरणादायी जीवनकार्याची ओळख नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी हे स्मारक महत्त्वपूर्ण ठरणार आहे. करूणा सामाजिक समतेचा संदेश अधिक प्रभावीपणे पोहोचविणारे हे स्मारक पिंपरी चिंचवड शहराच्या सांस्कृतिक ओळखीत मोलाची भर घालणार आहे.
– रवि लांडगे, महापौर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर सृष्टी भूमिपूजन कार्यक्रमानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर सृष्टीच्या भूमिपूजन कार्यक्रमानिमित्त मंगळवार, २८ एप्रिल २०२६ रोजी पिंपरी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक (भीमसृष्टी) शेजारील परिसरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सकाळी ९.३० वाजता सुप्रसिद्ध लोकगायक आनंद शिंदे यांच्या गीतगायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, ज्यामध्ये त्यांच्या लोकप्रिय आणि सामाजिक भान जागृत करणाऱ्या गीतांचा आस्वाद नागरिकांना घेता येणार आहे. तसेच सायंकाळी ७.०० वाजता ‘मी रमाई’ या एकपात्री नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले असून, हा प्रयोग मराठी अभिनेत्री प्रियांका उबाळे सादर करणार आहेत. माता रमाई आंबेडकर यांच्या जीवनातील संघर्ष, त्याग आणि प्रेरणादायी प्रवास यांचे प्रभावी चित्रण या नाट्यप्रयोगातून उलगडले जाणार आहे. या सर्व कार्यक्रमांच्या माध्यमातून नागरिकांना सांस्कृतिक तसेच वैचारिक समृद्धीचा अनुभव मिळणार असून, मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.




