शबनम न्यूज | प्रतिनिधी
भूजल सर्वेक्षण अहवाल देण्यासाठी दोन लाख रुपयांची लाच स्वीकारताना अॅन्टी करप्शन ब्युरो (ACB) पुणे पथकाने शिवाजीनगर येथील भूजल सर्वेक्षण विभागात धाड टाकून दोन अधिकाऱ्यांविरोधात कारवाई केली. या कारवाईमुळे शासकीय विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
ACB ने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे बांधकाम व्यावसायिक असून इमारतीच्या पूर्णत्व प्रमाणपत्रासाठी त्यांनी PMRDA कडे अर्ज केला होता. त्यावेळी PMRDA कडून भूजल सर्वेक्षण अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले. त्यानुसार तक्रारदारांनी शिवाजीनगर येथील भूजल सर्वेक्षण विभागात अर्ज केला होता.
यावेळी अहवाल देण्यासाठी सुरुवातीला अडीच लाख रुपयांची लाच मागण्यात आल्याची तक्रार ACB कडे करण्यात आली. तक्रारीची पडताळणी 22 एप्रिल रोजी करण्यात आली. तपासादरम्यान वरिष्ठ भूवैज्ञानिक दिवाकर नामदेव धोटे (वय 53) यांच्या वतीने कनिष्ठ भूवैज्ञानिक प्रियंका संदीपान घुले (वय 39) यांनी लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले.
त्यानंतर तडजोडीनंतर दोन लाख रुपये स्वीकारण्याचे ठरविण्यात आले. शुक्रवारी (24 एप्रिल) ACB ने सापळा रचला. त्यावेळी प्रियंका घुले यांना तक्रारदाराकडून दोन लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले, तर दिवाकर धोटे यांनाही कार्यालयातून ताब्यात घेण्यात आले.
दोन्ही आरोपींविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजीत पाटील व अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुहास हट्टेकर आणि खंडेराव रंजवे यांच्या पथकाने केली.
शासकीय कामासाठी कोणीही कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त लाचेची मागणी करत असल्यास नागरिकांनी तात्काळ ACB शी संपर्क साधावा, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.




