पिंपरी चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब
जबरी चोरी, चेन स्नॅचिंग, घरफोडी आणि चोरीच्या गुन्ह्यांमध्ये सक्रिय असलेल्या दोन सराईत टोळ्यांचा पर्दाफाश करत पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत आरोपींना अटक करून तब्बल २३ गुन्हे उघडकीस आणण्यात आले असून सुमारे ४६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्त मुद्देमालामध्ये सुमारे ३२ तोळे सोन्याचे दागिने, मोटारसायकली आणि इतर साहित्याचा समावेश आहे. पुणे ग्रामीण जिल्ह्यात वाढत्या चोरी, घरफोडी व चेन स्नॅचिंगच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने स्वतंत्र तपास पथके तयार करून सीसीटीव्ही फुटेज, गोपनीय माहिती आणि रेकॉर्डवरील आरोपींची हालचाल तपासण्यास सुरुवात केली. तपासादरम्यान मंचर परिसरातील हर्षल दत्तात्रय तांदळे (वय २५) आणि महेश दत्तात्रय मंगळवेढेकर (वय २५) यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी अनेक घरफोडी व चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून सुमारे २० तोळे सोन्याचे दागिने, पल्सर मोटारसायकल व इतर साहित्य असा २९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दरम्यान, चेन स्नॅचिंग आणि जबरी चोरी प्रकरणांच्या तपासात पियुष बिरम नानावत (वय १९, रा. कामशेत) यालाही अटक करण्यात आली. त्याने दोन विधीसंघर्षित बालकांच्या मदतीने विविध भागांत गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याकडून सुमारे १२ तोळे सोन्याचे दागिने, मोटारसायकल असा १७ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
या कारवाईत जुन्नर, आळेफाटा, नारायणगाव, लोणावळा, मावळ, सासवड, बारामती, राजगड, भोर, वेल्हा, शिरूर, खेड आदी भागांतील एकूण २३ गुन्हे उघडकीस आले आहेत.
पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई केली असून पुढील तपास सुरू आहे.





Total Users : 213412