पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी – युनूस खतीब
पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करत एमडी (मेफेड्रॉन) विक्री करणाऱ्या तिघांना अटक केली. आरोपींकडून ११६.५४ ग्रॅम एमडी, तीन मोबाईल फोन व एक मोपेड असा एकूण १३ लाख ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई २२ एप्रिल रोजी रात्री दक्षिण म्हाळुंगे पोलीस ठाण्याच्या हद्दीत खालुंब्रे गावाजवळ करण्यात आली. पोलीस पेट्रोलिंगदरम्यान संशयास्पद हालचाली करणाऱ्या मोपेडस्वारांना अडवून तपासणी केली असता त्यांच्याकडे एमडी आढळून आला.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये शिशुपाल धनाराम चौधरी (वय २५), रामदिन भवरलाल चौधरी (वय २४) तसेच त्यांना मेफेड्रॉन पुरवणारा परविण मल्लाराम चौधरी (वय २२) यांचा समावेश आहे. तिघांविरुद्ध दक्षिण म्हाळुंगे पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जासभाये करीत आहेत.




