शबनम न्यूज | प्रतिनिधी
पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समिती बैठकीत रास्ता पेठेतील छत्रपती शाहू महाराज जलतरण तलाव या विषयावर जोरदार चर्चा रंगली. तलावाच्या कंत्राट व्यवस्थापनावरून सत्ताधारी आणि प्रशासनामध्ये चांगलीच खडाजंगी झाली. सभागृह नेते गणेश बिडकर यांनी हा मुद्दा उपस्थित करत, जलतरण तलावाचे कंत्राट 2024 साली संपुष्टात आले असतानाही तेच कंत्राटदार आजपर्यंत व्यवस्थापन कसे करत आहेत, असा सवाल उपस्थित केला. या गंभीर बाबीची दखल घेत आयुक्तांनी तातडीने तलाव सील करण्याची भूमिका मांडली.
मात्र, या निर्णयाला विरोध करत नगरसेवक प्रशांत जगताप यांनी प्रशासनाला धारेवर धरले. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये परिसरातील मोठ्या संख्येने लहान मुले या तलावात पोहण्यासाठी येतात. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे या मुलांना त्रास होऊ नये, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
तसेच, संबंधित कंत्राटदाराकडून जलतरण तलावाचा ताबा घेऊन तो थेट महापालिकेच्या नियंत्रणाखाली चालवावा, अशी ठोस मागणीही त्यांनी केली. त्यांच्या या सूचनेवर सकारात्मक विचार करण्यात येईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिले.
दरम्यान, या प्रकरणामुळे महानगरपालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पुढील काही दिवसांत प्रशासन काय निर्णय घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.




