पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब
पिंपरी चिंचवड शहरातील दापोडी पोलिसांनी मोठी कारवाई करत कासारवाडी परिसरातून दोन तरुणांना देशी बनावटीची दोन पिस्तुले, मॅगझीन आणि जिवंत काडतुसे यांसह अटक केली आहे. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत १ लाख ३१ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. २२ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६.३५ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. भोसरी-सांगवी ओव्हरब्रिजखाली, कासारवाडी कडे जाणाऱ्या रस्त्यावरील फुटपाथवर संशयास्पद हालचाली करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
तपासणीदरम्यान आरोपींकडून दोन देशी बनावटीची पिस्तुले, मॅगझीनसह सहा जिवंत काडतुसे, दोन रिकामी मॅगझीन असा अवैध शस्त्रसाठा आढळून आला. या शस्त्रांसाठी कोणताही वैध परवाना आरोपींकडे नव्हता.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत :
यश नंदकिशोर कांबळे (वय १९, रा. पिंपळे गुरव)
अथर्व सुनिल भोकरे (वय २१, rा. नवी सांगवी)
सदर भागात घातक शस्त्रे बाळगण्यास मनाई आदेश लागू असतानाही आरोपींनी आदेशाचा भंग केल्याचे तपासात समोर आले आहे.
या प्रकरणी दापोडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ८९/२०२६ नुसार भारतीय हत्यार कायदा कलम ३, २५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३) सह १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस हवालदार प्रविण दौलत पाटील यांच्या फिर्यादीवरून करण्यात आली असून पुढील तपास पोउपनि पवळे करीत आहेत. परिसरात या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.





Total Users : 213431