पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : युनूस खतीब
पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरात ऑनलाइन टास्क पूर्ण करून पैसे कमावण्याचे आमिष दाखवत एका गृहिणीची तब्बल 24 लाख 28 हजार 987 रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शाहीन अफरोज (वय 47, रा. काळेवाडी फाटा, वाकड) यांना व्हॉट्सअॅपवरून “एच. आर. मेगा इंडिया लिमिटेड” या नावाने संपर्क साधण्यात आला. घरबसल्या टास्क पूर्ण करून मोठी कमाई करता येईल, असे आमिष दाखवण्यात आले.
यानंतर आरोपींनी फिर्यादी यांना टेलिग्राम अॅपवर जोडले. तेथे शमिका, लायला शर्मा आणि रजत बाळाकृष्णन या नावाने संपर्क साधून विविध टास्क पूर्ण करण्याच्या बहाण्याने वेळोवेळी पैसे भरण्यास भाग पाडले.
फिर्यादी यांनी आरोपींवर विश्वास ठेवून विविध बँक खात्यांमध्ये टप्प्याटप्प्याने 24,28,987 रुपये जमा केले. त्यानंतर आरोपींकडून आणखी 23 लाख रुपये भरण्याची मागणी करण्यात आली. त्यावेळी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी यांनी पोलिसांकडे धाव घेतली.
या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 201/2026 नुसार भारतीय न्याय संहिता कलम 318(4), 319(2), 3(5) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम 66(D) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत. नागरिकांनी सोशल मीडियावरील कमाईच्या आमिषांना बळी न पडण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.





Total Users : 213431