पिंपरी चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब
पिंपरी चिंचवड शहरातील पवनानगर परिसरात आधारकार्ड आणि पॅनकार्ड मागण्याच्या कारणावरून कौटुंबिक वाद चिघळून पुतण्याने काका व काकूला मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात काका जखमी झाले असून सांगवी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना सोमवारी (दि. २१ एप्रिल) सकाळी साडेनऊच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळील सोपान निवास येथे घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शंकर नखाते यांच्या आई यमुनाबाई नखाते (वय ६५) या त्यांच्या पुतण्या तेजस नखाते याच्याकडे स्वतःचे आधारकार्ड व पॅनकार्ड मागण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी आरोपीने कागदपत्रे देण्यास नकार देत शिवीगाळ केली व त्यांना ढकलून दिले.
ही बाब समजल्यानंतर फिर्यादी शंकर नखाते आणि त्यांची पत्नी जाब विचारण्यासाठी गेले असता आरोपी तेजस नखाते याने दोघांनाही शिवीगाळ करत हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच फिर्यादीला ढकलून देत जवळ पडलेला सिमेंटचा गट्टू डोक्यात मारून जखमी केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी तेजस संतोष नखाते (वय २४) याच्याविरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.





Total Users : 213431