शबनम न्यूज | प्रतिनिधी
लोणावळा, तळेगाव दाभाडे नगरपरिषद आणि वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत सुरु असलेल्या विकास कामांना गती द्यावी. उन्हाळा सुरु असल्याने पुरेशा प्रमाणात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा. पाण्याच्या तक्रारी येऊ देऊ नका, पावसाळ्यापूर्वीची कामे हाती घ्यावीत. प्रलंबित कामांचे प्रस्ताव तयार करुन राज्य शासनाकडे पाठवावेत. त्याला मान्यतेसह निधी मिळवून दिला जाईल, अशी ग्वाही शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली.
मावळ लोकसभा मतदारसंघातील लोणावळा, तळेगाव दाभाडे नगरपरिषद आणि वडगाव नगरपंचायतीच्या कामासंदर्भात खासदार बारणे यांनी सोमवारी आढावा बैठका घेतल्या. आमदार सुनील शेळके, तिन्ही नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, नगरसेवक, नगरसेविका, संबंधित विभागाचे सर्व अधिकारी बैठकांना उपस्थित होते. केंद्र, राज्य सरकारच्या विविध योजनांचा आढावा घेतला. तिन्ही स्थानिक स्वराज्य संस्थांना मोठ्या प्रमाणात खासदार निधी उपलब्ध करुन दिला आहे. भविष्यातही निधीची कमतरता भासू दिली जाणार नसल्याची ग्वाही खासदार बारणे यांनी दिली. लोणावळ्यातील बैठकीला नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, उपनगराध्यक्ष देविदास कडू, सनी दळवी, दिपा आगरवाल, धनंजय काळोखे, जीवन गायकवाड, स्वप्ना कदम, सनी घोणे, मुकेश परमार, दत्तात्रय येवले, शिवासेना जिल्हा प्रमुख राजाभाऊ खांडभोर, उप तालुका प्रमुख सोमनाथ कोंडे, मदन शेडगे, शिवसेना लोणावळा शहर प्रमुख संजय भोईर, शिवसेना महिला लोणावळा शहर संघटिका मनीषाताई भांगरे, युवासेना मावळ लोकसभा अध्यक्ष विशाल हुलावळे, शिवसेना लोणावळा उप शहर प्रमुख विशाल पाठारे, वडगाव नगरपंचायतीमधील बैठकीला उपनगराध्यक्ष सुनिल ढोरे, विरोधी पक्षनेत्या अर्चनाताई म्हाळस्कर, मुख्याधिकारी प्रवीण निकम, युवासेना तालुका प्रमुख विशाल आणि तळेगावमधील बैठकीला नगराध्यक्ष संतोष दाभाडे, मुख्याधिकारी गिरीश दापकेकर, माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी, शिवसेना जिल्हा प्रमुख राजाभाऊ खांडभोर, शिवसेना तळेगाव दाभाडे शहर प्रमुख देव खरटमल, सुनिल (मुन्ना) मोरे उपस्थित होते
भुशी डॅमकडे जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण
लोणावळा पर्यटननगरी आहे. देशभरासह राज्यातील पर्यटक लोणावळ्यात येतात. भुशी डॅमकडे जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण करावे. पावसाळ्यापूर्वीच्या कामांना गती द्यावी. नालेसफाई करावी. पावसाळ्यात कोठेही पाणी साचता कामा नये. पर्यटकांना त्रास होता कामा नये. पर्यटकांमुळे अर्थकारणाला चालना मिळते. त्यांना सर्व सुविधा दिल्या पाहिजेत. लोणावळ्या रेल्वे स्थानक परिसरात पार्किंगची व्यवस्था करण्याची नागरिकांची मागणी आहे. याबाबत रेल्वे विभागाबरोबर बैठक घेऊन निर्णय घेण्यात येणार आहे. पर्यटननगरीसाठी राज्य सरकारकडून मोठा निधी मिळतो. त्याचा योग्य विनियोग करुन नियोजनबद्ध कामे करावीत, अशी सूचना खासदार बारणे यांनी दिली.
खंडाळ्यातील उड्डाणपुलाची डागडुजी
रेल्वे विभागाच्या प्रलंबित कामांनाही केंद्र सरकारच्या माध्यमातून गती दिली आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रेल्वे उड्डाणपुलाला मान्यता मिळाली आहे. रेल्वेचे काम अंतिम टप्प्यात असून नगरपरिषदेने रस्त्याच्या कामाला गती द्यावी. नगरपरिषदेने त्याचा आढावा घेऊन काम मार्गी लावावे. पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून काही घरकुलांना मान्यता मिळाली आहे. त्यासाठीची जागा निश्चित करुन घरे बांधण्याला गती द्यावी. पुणे-मुंबई रस्ता लोणावळ्यातून जातो. या रस्त्याची देखभाल, दुरुस्ती एमएसआरडीसीकडे आहे. खंडाळ्यातील उड्डाणपुलाची डागडुजी, सुशोभीकरण करण्याच्या सूचना खासदार बारणे यांनी एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
पाणीपुरवठा योजनेसाठी राज्य शासनाकडून निधी
वडगावमधील पोटोबा देवस्थान लगत असलेल्या तलावाचे सुशोभीकरण करावे. क्रीडांगण विकसित करावे. अमृत भारत योजनेअंतर्गत एसटीपी प्रकल्प उभारण्यासाठीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात यावा. तळेगाव दाभाडे शहरातील पाणीपुरवठा योजनेला मान्यता मिळाली आहे. योजना राबविण्यासाठी ११६ कोटी रुपये लागणार आहेत. त्यासाठी नगरविकास विभागाकडून निधी उपलब्ध करुन दिला जाईल. तिन्ही नगरपरिषद, पंचायतीच्या हद्दीमध्ये क्रींंडागणे, ओपन जीम, शाळांसाठी स्मार्ट बोर्ड सीएसआरमधून उपलब्ध करुन दिले जातील. सुरु असलेल्या सर्व कामांना गती द्यावी. तीन महिन्यांनी पुन्हा आढावा घेण्यात येईल, असेही खासदार बारणे यांनी सांगितले.
रेल्वेच्या प्रश्नांसदर्भात २८ एप्रिलला बैठक
मावळ लोकसभा मतदारसंघातील पिंपरी, चिंचवड आणि मावळ तिन्ही विधानसभा मतदारसंघातील रेल्वेच्या प्रश्नांसदर्भात २८ एप्रिल रोजी बैठक घेण्यात येणार आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींबरोबर ही बैठक घेण्यात येणार असल्याचे खासदार बारणे यांनी सांगितले.




