spot_img
spot_img
spot_img

पिंपरीच्या सर्वांगीण विकासासाठी डब्बू आसवानी यांचा पाठपुरावा; आयुक्तांसोबत विविध प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक चर्चा

शबनम न्यूज | प्रतिनिधी

सोमवार, दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी पिंपरीच्या सर्वांगीण विकासासाठी डब्बू आसवानी यांच्या नेतृत्वाखाली महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले. पिंपरी परिसरातील प्रलंबित प्रश्न तातडीने निकाली काढण्यासाठी त्यांनी महानगरपालिका आयुक्तांची प्रत्यक्ष भेट घेऊन तब्बल १८ महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली.

या बैठकीत पिंपरी मार्केटमधील पार्किंगच्या समस्येवर उपाय म्हणून मल्टीलेव्हल पार्किंग उभारण्याची मागणी करण्यात आली. तसेच साई चौक, शगुन चौक, डिलक्स चौक, जमतानी चौक, त्रिलोक स्मशानभूमी चौक आणि भाटनगर परिसरातील वाहतुकीचे सुयोग्य नियोजन करण्याबाबत प्रशासनाकडे आग्रही भूमिका मांडण्यात आली.

डेअरी फार्म रेल्वे उड्डाणपुलाचे काम वेळेत पूर्ण करून त्याला ‘लोकनेते दिवंगत मा. अजितदादा पवार साहेब उड्डाणपूल’ असे नाव देण्याचा प्रस्तावही डब्बू आसवानी यांनी मांडला.

स्वच्छता आणि आरोग्य विषयावर चर्चा करताना कचरा संकलनातील हलगर्जीपणा तसेच प्रभाग क्रमांक २१ मधील आरोग्य निरीक्षकांच्या कामकाजाबाबत आयुक्तांचे लक्ष वेधण्यात आले. पिंपरी म्हाडा परिसरालगतच्या आरक्षित जागेवर २० लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी उभारणे, बुस्टर पंप बसवणे आणि सुरक्षेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा सुरू करण्याबाबतही चर्चा झाली.

नागरी सुविधांच्या दृष्टीने जन्म-मृत्यू दाखले त्वरित उपलब्ध करून देणे, उद्यानांची दुरवस्था थांबवून तेथे रखवालदार नेमणे, तसेच खेळाची मैदाने विकसित करणे या मागण्या करण्यात आल्या. याशिवाय शहरातील वाढती बेघरांची संख्या आणि लावारिस वाहनांचा प्रश्न सोडवण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त करण्यात आली.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर गटर, ड्रेनेज आणि नाल्यांची आधुनिक पद्धतीने साफसफाई करण्याबाबतही प्रशासनाला सूचना देण्यात आल्या.

आयुक्तांसोबत झालेल्या या सकारात्मक चर्चेमुळे पिंपरीतील विकासकामांना अधिक गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला असून नागरिकांसाठी हा पुढाकार दिलासादायक ठरणार आहे.

या बैठकीस नगरसेविका निकिता ताई कदम, नगरसेविका प्रियांका ताई कुदळे, महापालिका वरिष्ठ अधिकारी बाप्पू गायकवाड, पवार, संतोष कुदळे, सूर्यवंशी, बहुरे, ननावरे, गवळी, ननावरे मॅडम तसेच महापालिका कन्सल्टंट आदी उपस्थित होते.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!