spot_img
spot_img
spot_img

मटका-जुगार अड्डे चालवणाऱ्या रफीक काझीवर एमपीडीएची कारवाई

१८ गुन्हे दाखल; एक वर्षासाठी अमरावती कारागृहात स्थानबद्ध

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने अवैध मटका व जुगार व्यवसायाविरोधात कठोर भूमिका घेत दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील सराईत आरोपी रफीक शगीर काझी (वय ३९, रा. काजीवाडा, चाकण) याच्यावर एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्धतेची कारवाई केली आहे. आरोपीला एक वर्षासाठी मध्यवर्ती कारागृह, अमरावती येथे रवाना करण्यात आले आहे.

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी शहरातील मटका, जुगार व इतर बेकायदेशीर धंद्यांवर प्रभावी कारवाईचे आदेश दिल्यानंतर ही मोठी कारवाई करण्यात आली. आरोपी रफीक काझी हा चाकण परिसरात ‘कल्याण’ नावाचा मटका व जुगार अड्डा चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याच्याविरोधात यापूर्वी एकूण १८ गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

त्याच्या वाढत्या गुन्हेगारी कारवायांमुळे समाजात दहशत निर्माण होत असल्याने त्याच्याविरोधात एमपीडीए अंतर्गत प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यानंतर पोलीस आयुक्तांनी प्रस्तावास मंजुरी देत एक वर्षासाठी स्थानबद्धतेचे आदेश जारी केले.

दरम्यान आरोपी फरार झाल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, गुप्त बातमीदारांचे जाळे आणि विशेष पथकाच्या मदतीने त्याचा शोध घेत शिताफीने ताब्यात घेतले. त्यानंतर दि. २१ एप्रिल २०२६ रोजी अमरावती कारागृहात रवानगी करण्यात आली.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त सारंग आवाड, अप्पर पोलीस आयुक्त बसवराज तेली, पोलीस उप आयुक्त श्वेता खेडकर, सहपोलीस आयुक्त सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ व त्यांच्या पथकाने केली.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!