पिंपरी चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब
हिंजवडी आयटी पार्क परिसरातील वाहनचालकांसाठी महत्त्वाची सूचना देण्यात आली असून हिंजवडी फेज-२ मधील विप्रो सर्कल ते एमआयडीसी सर्कल मार्गावर २६ एप्रिलपर्यंत वाहतूक कोंडीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. महाराष्ट्र विद्युत पारेषण कंपनीच्या केबलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे.
वाहतूक शाखेकडून मिळालेल्या माहितीनुसार, मेट्रो स्टेशन क्रमांक-३ (PMR-3) खाली, डॉलर कंपनीसमोर रस्ता खोदण्यात आला असून या ठिकाणी सध्या केवळ एकाच लेनमधून वाहतूक सुरू आहे. त्यामुळे सकाळी ८ ते ११ आणि संध्याकाळी ४ ते रात्री ८ या पीक अवर्समध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.
वाहतूक पोलिसांनी नागरिकांना अत्यावश्यक काम असल्यासच या मार्गाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. अन्यथा पर्यायी मार्गांचा वापर करून पोलिसांना सहकार्य करावे, असे सांगण्यात आले आहे.
विप्रो सर्कल ते एमआयडीसी सर्कल दरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांनी गर्दीचे प्रमाण लक्षात घेऊन वेळेचे नियोजन करावे, असे आवाहन वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे.
केबल दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून २६ एप्रिलपर्यंत वाहतूक पूर्ववत होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.




