पिंपरी चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब
चाकण औद्योगिक परिसरातील एका कंपनीत डायकास्टिंग मशीनमध्ये हात अडकल्याने कामगार गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी निष्काळजीपणाबाबत कंपनीच्या विभागप्रमुखाविरोधात उत्तर चाकण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १२ एप्रिल रोजी रात्री पावणेनऊच्या सुमारास आंबेठाण रोडवरील Samarth Industry Company येथे घडली. याप्रकरणी तात्या रामा चव्हाण (वय ४१) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादी यांना डायकास्टिंग मशीनवर कामाचा पुरेसा अनुभव नसतानाही कंपनीचे विभागप्रमुख चौधरी यांनी मशीन चालू करून काम करण्यास सांगितल्याचा आरोप आहे. काम सुरू असताना मशीनच्या डायमध्ये अॅल्युमिनियम अडकले होते. ते काढण्याचा प्रयत्न करत असताना अचानक मशीन बंद होत डाय क्लोज झाली.
यामध्ये फिर्यादीचा डावा हात मनगटापासून पंजापर्यंत मशीनमध्ये अडकला. हाताचा पंजा व पाचही बोटांचा गंभीर चुराडा होऊन फ्रॅक्चर झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी उत्तर चाकण पोलीस पुढील तपास करीत आहेत.




