पिंपरी चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब
महिलेचे आणि तिच्या कुटुंबीयांचे मॉर्फ केलेले अश्लील फोटो सोशल मीडियावर व वेबसाईटवर अपलोड करून ते हटविण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी करणाऱ्या आरोपीला रावेत पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ एप्रिल ते १८ एप्रिल २०२६ या कालावधीत हा प्रकार ऑनलाईन माध्यमातून घडला. याप्रकरणी एका पुरुषाने रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार ऋषीकेश भाऊसाहेब शिंदे (रा. हिंजवडी फेज-३, ता. मुळशी, जि. पुणे) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
आरोपीने वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकांवरून फिर्यादी, त्यांची होणारी पत्नी तसेच मित्रपरिवाराला मॉर्फ केलेले नग्न फोटो पाठविले. फिर्यादीच्या पत्नी व आईचे अश्लील स्वरूपात बनावट फोटो तयार करून ते काही संकेतस्थळांवर अपलोड केल्याचा आरोप आहे.
त्यानंतर “पाच लाख रुपये दिल्यास हे फोटो हटवून टाकतो,” अशी धमकी देत आरोपीने पैशांची मागणी केली. मानसिक त्रास सहन न झाल्याने फिर्यादीने पोलिसांकडे धाव घेतली.
रावेत पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.




