पिंपरी चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब
पूर्वीच्या शेतीच्या वादातून एका महिलेला शिवीगाळ करत हाताबुक्क्यांनी तसेच दगडाने मारहाण करून जखमी केल्याची घटना चोरघेवाडी (ता. खेड) येथे घडली. याप्रकरणी उत्तर महाळुंगे पोलिसांनी एका आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १९ एप्रिल रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास फिर्यादी महिलेच्या राहत्या घराजवळ चोरघेवाडी येथे घडली. पीडित महिलेने याबाबत उत्तर महाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार समीर लक्ष्मण चोरघे (वय २९, रा. चोरघेवाडी पाईट, ता. खेड, जि. पुणे) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
फिर्यादीने पाईपलाईन का फोडत आहेस, असा जाब विचारल्याचा राग मनात धरून आरोपीने महिलेला शिवीगाळ केली. त्यानंतर हाताबुक्क्यांनी मारहाण करत दगडाने हल्ला करून दुखापत केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
उत्तर महाळुंगे पोलीस पुढील तपास करीत आहेत.




