spot_img
spot_img
spot_img

‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’ येथून आता शिवचरित्र प्रसार अभियान

शबनम न्यूज | प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तेजस्वी वारशाचा जागर करत, “शिवचरित्र प्रसार अभियान” अंतर्गत स्वराज्यातील २५ ऐतिहासिक किल्ल्यांची प्रेरणादायी अश्वारोहण मोहिमेचा प्रारंभ करण्यात येणार आहे. मोशी येथील स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण परिसरातून ही मोहीम सुरू होणार असून, हिंदुभूषण स्मारक ट्रस्ट आणि दिग्विजय प्रतिष्ठानच्या रजत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केली आहे.

संस्कृती, स्वातंत्र्य, स्वराज्य आणि समृद्धी या मूल्यांची सांगड घालत, या उपक्रमाचा उद्देश इतिहास, परंपरा आणि अश्वविद्या यांचा संगम साधून समाजात स्वाभिमान जागवणे व नव्या पिढीला प्रेरणा देणे हा आहे. उद्घाटन प्रसंगी मान्यवरांसह शेकडो शिवप्रेमी उपस्थित राहणार आहेत.

या मोहिमेत सहभागी घोडेस्वार पुढील काही दिवसांत स्वराज्यातील २५ ऐतिहासिक किल्ल्यांना भेट देणार असून, मार्गावरील किल्ले व नद्यांमधून पवित्र जलसंकलन करणार आहेत. तसेच, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधत इतिहास व सांस्कृतिक वारशाबाबत जागृती निर्माण केली जाणार आहे.

महाराष्ट्रात अश्वारोहण क्रीडाप्रकाराचा प्रसार व लोकप्रियता वाढवणे, तसेच स्थानिक नागरिकांच्या सहभागातून पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणे, हीदेखील या मोहिमेची वैशिष्ट्ये आहेत. देशभरातून सहभाग वाढवण्यासाठी राष्ट्रीय पातळीवरील ऑनलाइन स्पर्धाही आयोजित करण्यात आली आहे.

हिंदूभूषण स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष तथा आमदार महेश किसनराव लांडगे आणि सिल्व्हर ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक संतोष सीताराम बारणे यांच्या उपस्थितीत मोहिमेला हिरवा कंदील दाखवण्यात येणार आहे. सोशल मीडिया, छापील माध्यमे आणि डिजिटल व्यासपीठांवर या उपक्रमाची व्यापक प्रसिद्धी करण्यात येणार आहे. “शिवचरित्र प्रसार अभियान” ही केवळ एक मोहिम नसून, स्वराज्याच्या वैभवाची पुनर्स्मृती जागवणारा आणि तरुणाईला इतिहासाशी जोडणारा एक सशक्त सांस्कृतिक सेतू निर्माण करण्याचा संकल्प या निमित्ताने केला आहे.

“छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा इतिहास केवळ पुस्तकांत नाही, तर आपल्या कृतीतून जिवंत ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. ही अश्वारोहण मोहिम म्हणजे पराक्रम, संस्कृती आणि स्वाभिमान यांची नव्या पिढीपर्यंत पोहोचवणारी प्रेरणायात्रा आहे. यामध्ये शिव-शंभूप्रेमींनी अभिमानाने सहभागी व्हावे, असे आवाहन करतो.
– महेश लांडगे, अध्यक्ष, हिंदूभूषण स्मारक ट्रस्ट.

“इतिहास जपणे म्हणजे केवळ भूतकाळाची आठवण ठेवणे नव्हे, तर त्यातून प्रेरणा घेऊन भविष्य घडवणे होय. ‘शिवचरित्र प्रसार अभियान’ ही आपल्या संस्कृती, परंपरा आणि स्वाभिमान यांना नव्या पिढीपर्यंत पोहोचवणारी एक सशक्त चळवळ आहे.”
– संतोष बारणे, संचालक, सिल्व्हर ग्रुप.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!