पिंपरी चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब
देहूरोड परिसरात शस्त्रबंदी आदेश लागू असतानाही गावठी बनावटीचे पिस्टल आणि जिवंत काडतूस बाळगणाऱ्या तरुणाला देहूरोड पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ एप्रिल रोजी सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास महात्मा गांधी विद्यालयामागे, एम.बी. कॅम्पकडे जाणाऱ्या रस्त्यालगत संशयित हालचाली करणाऱ्या एका तरुणाची पोलिसांनी झडती घेतली. त्यावेळी त्याच्याकडून एक गावठी बनावटीचे पिस्टल, मॅगझीन आणि एक जिवंत राऊंड असा एकूण ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव विर शाम डुलगज (वय २०, रा. पारशी चाळ, देहूरोड) असे आहे.
विशेष म्हणजे, पिंपरी चिंचवड विशेष शाखेकडून १५ एप्रिल ते २८ एप्रिल दरम्यान महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ अंतर्गत शस्त्रबंदी आदेश लागू करण्यात आलेला असताना आरोपीकडे हे बेकायदेशीर शस्त्र सापडले.
या प्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात आर्म अॅक्ट कलम ३(२५) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास वरिष्ठ पोलीस उपनिरीक्षक वाव्हळे करीत आहेत.




