spot_img
spot_img
spot_img

“ड्रग्सविरोधात कठोर कारवाई करा, पोलिसांना फ्री हँड द्या” – अमित ठाकरे यांचा सरकारवर हल्लाबोल

शबनम न्यूज | प्रतिनिधी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी संघटनात्मक बदलांपासून ते राज्यातील वाढत्या ड्रग्सच्या समस्येपर्यंत विविध मुद्द्यांवर भाष्य करत सरकारवर जोरदार टीका केली. “राज्यात ड्रग्स मोठ्या प्रमाणात येत आहेत, मात्र ते रोखण्यात सरकार अपयशी ठरत आहे,” असा आरोप त्यांनी केला.

संघटनात्मक बाबींवर बोलताना अमित ठाकरे म्हणाले की, राज ठाकरे यांनी राज्यभर संपर्क अध्यक्ष नेमले असून आता ते स्वतः कार्यकर्त्यांना ‘वन टू वन’ भेटणार आहेत. “आम्ही सगळ्यांकडून अभिप्राय घेणार आहोत, आम्ही कुठे कमी पडतोय हे जाणून घेणार आहोत. त्यानुसार संघटनेत बदल करून सविस्तर अहवाल साहेबांना देणार,” असे त्यांनी सांगितले. तसेच २५ आणि २६ तारखेला ग्रामीण भागात दौरा करून इतर संघटनांच्या कार्यकर्त्यांनाही भेटणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ड्रग्स प्रकरणावर संताप

गोरगाव येथील प्रकरणावर प्रतिक्रिया देताना त्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. “राज्यात आणि शहरात ड्रग्स येतात कुठून? प्रत्येक शहरात ड्रग्स सापडत आहेत. शाळांच्या परिसरातही ड्रग्स विकले जात आहेत, ही अतिशय गंभीर बाब आहे,” असे ते म्हणाले.

“सरकारकडे याचे आकडे नाहीत का? ड्रग्स विकणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे. पोलिसांना २४ तास ‘फ्री हँड’ दिला पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली. “जर कठोर शिक्षा झाली नाही, तर असे प्रकार थांबणार नाहीत,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

‘पोर्शे प्रकरण’ विसरू नका

पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणाचा संदर्भ देत त्यांनी सरकारवर निशाणा साधला. “आपण पोर्शे प्रकरण विसरलो आहोत. अशा घटनांमधून धडा घेतला पाहिजे. सरकारला विचारले पाहिजे की एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्स येतात कुठून?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

नाशिक प्रकरणावर प्रतिक्रिया

नाशिकमधील प्रकरणाबाबत बोलताना त्यांनी कंपन्यांच्या तपासणीची मागणी केली. “प्रत्येक कंपनीचे १०० टक्के ऑडिट झाले पाहिजे. आपल्या कंपनीत कोण काम करतं, याची माहिती व्यवस्थापनाला असली पाहिजे,” असे त्यांनी सांगितले.

कठोर शिक्षेची मागणी

“अशा गुन्ह्यांमध्ये आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. उदाहरण घालून दिले नाही, तर गुन्हे वाढतच राहतील,” असे सांगत त्यांनी कठोर कारवाईची भूमिका पुन्हा अधोरेखित केली.

अमित ठाकरे यांच्या या वक्तव्यांमुळे राज्यातील कायदा-सुव्यवस्था आणि ड्रग्सविरोधातील कारवाई या मुद्द्यांवर पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!