पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी – युनूस खतीब
भोसरी परिसरात सुरु असलेल्या बेकायदेशीर जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकत सहा जणांना ताब्यात घेतले असून, तब्बल ४.१६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १६ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५.१९ वाजण्याच्या सुमारास जुना कचरा डेपो रोड, सदगुरूनगर, भोसरी येथील मोकळ्या जागेत हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पोलीस शिपाई ज्ञानेश्वर साळवे यांनी फिर्याद दिली आहे.
छाप्यामध्ये राजाभाऊ पालकर, सुभाष राठोड, अभय ओव्हाळ, अकबर शेख, रामदास गायकवाड आणि देवा राठोड या सहा जणांना पोलिसांनी पकडले. हे सर्व आरोपी तीन पत्त्यांचा जुगार खेळत असल्याचे निष्पन्न झाले.
कारवाईदरम्यान पोलिसांनी जुगाराचे साहित्य, मोबाईल फोन, दुचाकी व चारचाकी वाहने आणि रोख रक्कम असा एकूण ४,१६,८९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी भोसरी पोलिस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२ (अ) तसेच इतर लागू कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक टापरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, शहरातील बेकायदेशीर धंद्यांविरोधात कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.





Total Users : 213579