पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी – युनूस खतीब
मोठ्या गुंतवणुकीचे आमिष दाखवत उद्योगपतीची तब्बल ८४ लाखांहून अधिक रकमेची फसवणूक केल्याचा प्रकार तळेगाव एमआयडीसी परिसरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी सध्या फरार आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दि. १४ फेब्रुवारी २०२४ ते २३ जुलै २०२४ दरम्यान बधलवाडी (ता. मावळ) येथील ब्लॅक लायन ट्रान्सलिंक्स प्रा. लि. कंपनीत घडली. या प्रकरणी चेतन श्रीकांत चव्हाण (वय ४३, रा. मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे.
आरोपी सुजित ठाकुर (रा. विरार) याने फिर्यादीला कंपनीत १५ कोटी रुपयांची गुंतवणूक करून देण्याचे आमिष दाखवले. त्यासाठी ‘मार्जिन मनी’च्या नावाखाली सुरुवातीला १५,१४,००० रुपये युनिक वे मल्टिव्हेंचर्स प्रा. लि. या कंपनीच्या बँक खात्यात जमा करून घेतले.
त्यानंतर आरोपी शैलेश पटेल (रा. गुजरात) व सुजित ठाकुर यांनी संगनमत करून आणखी मोठ्या गुंतवणुकीचे आमिष दाखवत फिर्यादीचा विश्वास संपादन केला. ५० कोटींची गुंतवणूक करून देण्याचे सांगत, वेगवेगळ्या तारखांना आरोपींनी ६९,६०,००० रुपये विविध बँक खात्यांमध्ये जमा करून घेतले.
अशा प्रकारे ‘मार्जिन मनी’च्या नावाखाली एकूण ८४,७४,००० रुपये उकळून घेतल्यानंतर आरोपींनी कोणतीही गुंतवणूक केली नाही, तसेच घेतलेली रक्कमही परत न केल्यामुळे फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे.
या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खरात यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, आर्थिक गुन्ह्यांच्या वाढत्या घटनांमुळे औद्योगिक क्षेत्रात चिंता व्यक्त केली जात आहे.




