पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी – युनूस खतीब
चिंचवड पोलिसांनी वाहनचोरीच्या मालिकेचा पर्दाफाश करत एका विधिसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून चोरीच्या तब्बल ६ दुचाकी जप्त केल्या आहेत. या कारवाईमुळे चार वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले असून परिसरात दिलासा व्यक्त केला जात आहे.
चिंचवड पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा रजिस्टर क्रमांक १३६/२०२६ (कलम BNS ३०३(२)) च्या तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने छाननी केली. यातून संशयित अल्पवयीनाचा माग काढण्यात पोलिसांना यश आले. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ सापळा रचून संबंधित बालकाला ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान आरोपीने ६ दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. यापैकी ४ दुचाकींवर चिंचवड पोलीस ठाण्यात आधीच गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले, तर उर्वरित २ दुचाकींबाबत इतर पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे नोंद आहेत का, याचा तपास सुरू आहे.
या कारवाईमुळे गुन्हा रजिस्टर क्रमांक ११९/२०२६, १२५/२०२६, १३५/२०२४ आणि १३६/२०२४ असे चार गुन्हे उघडकीस आले आहेत. जप्त करण्यात आलेल्या दुचाकींची किंमतही लक्षणीय असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता चासकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी केली. या कारवाईमुळे शहरातील वाहनचोरीच्या घटनांवर आळा बसण्यास मदत होईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.




