पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी – युनूस खतीब
पिंपरी-चिंचवड शहरातील जुनी सांगवी परिसरात पहाटेच्या सुमारास पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन तरुणांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून देशी बनावटीची पिस्तुले आणि जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १५ एप्रिल २०२६ रोजी पहाटे ४.१० वाजण्याच्या सुमारास औंध जिल्हा हॉस्पिटलजवळील पॉवर हाऊस परिसरात ही कारवाई करण्यात आली. सांगवी पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई आकाश खंडागळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये साहिल दत्तात्रय साष्टे (वय १९, रा. कोथरुड) आणि साई विठ्ठल वाशिवले (वय १९, रा. कोथरुड) यांचा समावेश आहे. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून १ लाख रुपये किंमतीची दोन देशी बनावटीची पिस्तुले, ४ हजार रुपये किंमतीची चार जिवंत काडतुसे तसेच ५० हजार रुपये किंमतीची काळ्या रंगाची होंडा अॅक्टिव्हा असा एकूण १ लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
महत्त्वाचे म्हणजे, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ अंतर्गत घातक शस्त्रे बाळगण्यास मनाई आदेश लागू असताना आरोपींनी या आदेशाचे उल्लंघन केल्याचे निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणी भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३ (२५), भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३ (५) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करत आहेत.
या कारवाईमुळे संभाव्य गुन्हा टळल्याची शक्यता वर्तवली जात असून पोलिसांच्या सतर्कतेचे कौतुक केले जात आहे.





Total Users : 213632