पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी – युनूस खतीब
पुणे महानगरपालिकेच्या भवन रचना कार्यालयात आज सायंकाळी अंदाजे साडेचार ते पाचच्या सुमारास दोन महिलांमध्ये जोरदार वाद झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत एक नगरसेविका आणि एक महिला पालिका कर्मचारी यांच्यात तीव्र बाचाबाची झाली.
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, कार्यालय परिसरात अचानक मोठ्या आवाजात आरडाओरडा सुरू झाल्याने नागरिक आणि कर्मचारी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी जमा झाले. त्यावेळी संबंधित महिला कर्मचाऱ्याकडून मोठ्या आवाजात शिवीगाळ आणि आक्रमक वर्तन केल्याचे दिसून आले.
घटनेदरम्यान नगरसेविकेसोबत असलेल्या काही तरुणांनाही उद्देशून अपशब्द वापरण्यात आल्याची माहिती मिळते. विशेष म्हणजे, या सर्व प्रकारात नगरसेविका शांत राहिल्याचे सांगितले जात आहे.
या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी, संबंधित महिला कर्मचाऱ्याने इतक्या तीव्र प्रतिक्रिया का दिली, याबाबत चर्चा सुरू आहे.
दरम्यान, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी या प्रकरणाची दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.




