पिंपरी चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने चिखली परिसरातील एका लॉजवर धडक कारवाई करत अवैध वेश्याव्यवसायाचा मोठा पर्दाफाश केला. देहु-आळंदी रोडवरील लक्ष्मी चौक येथील आदित्य लॉजवर १३ एप्रिल रोजी उशिरा रात्री छापा टाकण्यात आला.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी एकूण ९ पीडित महिलांची सुटका केली. विशेष म्हणजे, यापैकी एक महिला बांगलादेशातून तस्करी करून आणलेली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. संबंधित महिलेला सुरक्षित ठेवून तिच्या मायदेशी पाठविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
तपासात लॉजच्या आडोशाला अवैध वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे उघड झाले. या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, लॉज मॅनेजर अशोक बाबर आणि कामगार अकिबुल मुल्ला यांना अटक करण्यात आली आहे. तसेच लॉज चालक, जागा मालक व अन्य संबंधितांविरुद्धही गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय न्याय संहिता कलम १४३(३), ६१(२) तसेच पिटा कायद्यांतर्गत कलम ३, ४, ५, ७ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, २०२६ या वर्षात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने आतापर्यंत ११ आस्थापनांवर छापे टाकले असून, त्यात ७ मसाज पार्लर/स्पा आणि ४ हॉटेल्सचा समावेश आहे. या सर्व कारवायांमध्ये एकूण ३१ आरोपींना अटक करण्यात आली असून २८ महिलांची सुटका करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर आयुक्त सारंग आवाड, बसवराज तेली, तसेच पोलीस उपआयुक्त (गुन्हे) डॉ. शिवाजी पवार आणि सहाय्यक आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गिते, विकास राऊत आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली शेंडगे यांच्यासह पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.
पोलिसांकडून अशा प्रकारच्या अवैध व्यवसायांविरुद्ध भविष्यातही अधिक कठोर आणि व्यापक कारवाया सुरू ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे.





Total Users : 213579