शबनम न्यूज | प्रतिनिधी
काळेवाडी परिसरातील एकतानगर भागात माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. केवळ अडीच वर्षांच्या चिमुरडीला आंब्याचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी ४७ वर्षीय नराधमाला काळेवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. विजय भोसले असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली. आरोपीने पीडित मुलीला आंबा खायला देण्याच्या बहाण्याने आपल्या खोलीत बोलावले आणि तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. मंगळवारी सकाळी चिमुरडीला त्रास होऊ लागल्याने पालकांनी तिला तातडीने महापालिकेच्या रुग्णालयात दाखल केले. तिथे डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला. आईने विश्वासात घेऊन विचारले असता, मुलीने आरोपीने घरात बोलावून अत्याचार केल्याचे सांगितले. घटनेचे गांभीर्य ओळखून रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना पाचारण केले. काळेवाडी पोलिसांनी तत्परता दाखवत एक पथक रुग्णालयात तर दुसरे पथक आरोपीच्या घरी पाठवून त्याला तातडीने अटक केली. याप्रकरणी पीडित मुलीच्या २८ वर्षीय आईने फिर्याद दिली असून, या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.





Total Users : 213579