spot_img
spot_img
spot_img

पिंपरी चिंचवड महानगरपालिका गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्नशील – महापौर रवि लांडगे

शबनम न्यूज | प्रतिनिधी

क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला शिक्षण व सामाजिक न्यायाचा विचार आत्मसात करीत आजची युवा पिढी यशाची नवी उंची गाठत आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये प्रशिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. या स्पर्धा केंद्रातील विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान असून महानगरपालिका अशा गुणवंत विद्यार्थ्यांना नेहमीच प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्नशील राहील, असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त आयोजित सामाजिक समता सप्ताह व ‘विचार प्रबोधन पर्व २०२६’ मध्ये पाचव्या दिवशी पहिल्या सत्रात महापालिकेच्या स्पर्धा परीक्षा केंद्रातील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी नगरसदस्य धर्मपाल तंतरपाळे यांच्यासह महापालिका उपायुक्त अण्णा बोदडे, पंकज पाटील, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

यावेळी महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते दिनकर गायकवाड (स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, नागपूर महानगरपालिका), प्रतीक वाघमोडे (महसूल सहाय्यक), कृष्णा लोखंडे ( वरिष्ठ तांत्रिक सहायक, अन्न व औषध प्रशासन,), सुमित कानडे (सहायक संचालक, महाराष्ट्र लेखा व वित्त विभाग), तनिषा गेगंजे (पोलीस शिपाई, पुणे शहर पोलीस), रणजित दाभाडे (लिपिक), ज्योती पानमंद (पुरवठा निरीक्षक), पायल शेलार (पिंपरी चिंचवड शहर पोलीस विभागात नियुक्ती), पूजा तलारे (भुकरमापक, भुमी अभिलेख, पुणे), सनी पोळ (पोलीस, पिंपरी चिंचवड शहर पोलीस विभागात नियुक्ती) आणि अक्षय काळडोके (गट विकास अधिकारी) या यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.

महापौर रवि लांडगे म्हणाले, ‘स्पर्धा परीक्षा केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना केवळ मार्गदर्शनच नव्हे तर योग्य दिशा, आत्मविश्वास आणि स्पर्धात्मक दृष्टिकोन मिळत आहे. आगामी काळातही अधिकाधिक विद्यार्थ्यांना या केंद्राचा लाभ मिळावा यासाठी विविध सुविधा आणि प्रशिक्षण अधिक सक्षम करण्यासाठी महानगरपालिका प्रयत्नशील राहील. स्पर्धा परीक्षा केंद्रातून यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर उल्लेखनीय कामगिरी करत शहराचे नाव उंचावले आहे. इतर विद्यार्थ्यांनीही या यशातून प्रेरणा घ्यावी, असे आवाहन देखील महापौर रवि लांडगे यांनी केले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!