पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब
संत तुकारामनगर : तडीपार आदेशाचा भंग करून पुन्हा शहरात प्रवेश करत धारदार शस्त्रासह फिरणाऱ्या आरोपीला संत तुकारामनगर पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई पिंपरी-नेहरूनगर रोडलगत एच.ए. ग्राऊंड परिसरात करण्यात आली.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १४ एप्रिल २०२६ रोजी पहाटे १:०५ वाजण्याच्या सुमारास आरोपी पवन सचिन ससाणे (वय २१, रा. गांधीनगर, पिंपरी) हा संशयास्पदरीत्या फिरताना आढळून आला. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे सुमारे ४०० रुपये किंमतीचा धारदार लोखंडी कोयता आढळून आला.
विशेष म्हणजे, संबंधित आरोपीला यापूर्वीच दि. १७ ऑक्टोबर २०२५ रोजी दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते. मात्र, कोणतीही कायदेशीर परवानगी न घेता त्याने पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीत प्रवेश करून तडीपार आदेशाचा भंग केला.
आरोपीकडे घातक शस्त्र बाळगण्यास मनाई असतानाही तो कोयता घेऊन संशयास्पद हालचाली करत असल्याने मोठा गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
या प्रकरणी पोलीस हवालदार जावेद मुजावर यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम ४ (२५) तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२, ३७ (१)(३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईमुळे परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यास मदत झाली असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.




