spot_img
spot_img
spot_img

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या नावाखाली २ लाखांची ऑनलाईन फसवणूक; हिंजवडीत गुन्हा दाखल

पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब

हिंजवडी : शेअर बाजारात जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका महिलेची २ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना हिंजवडी परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सायबर फसवणुकीचा तपास सुरू आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ३० एप्रिल २०२५ ते १३ एप्रिल २०२६ या कालावधीत हिंजवडी फेज-१ मधील सासरेवस्ती रोडवरील शुभम हॉस्पिटॅलिटी सर्व्हिसेस परिसरात घडली. फिर्यादी महिला आपल्या घरी असताना आरोपीने मोबाईलद्वारे संपर्क साधून शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले.

या प्रकरणात आनंद राठी शेअर्स अॅण्ड स्टॉक ब्रोकर लिमिटेड या कंपनीच्या नावाचा वापर करत ओमकार भिलारे नावाच्या इसमाने विश्वास संपादन केला. सुरुवातीला फिर्यादीकडून ३ लाख रुपये गुंतवणुकीसाठी घेतले व नंतर अधिक नफा मिळवून देण्याचे सांगत आणखी २ लाख रुपये दुसऱ्या बँक खात्यावर ट्रान्सफर करण्यास सांगितले.

फिर्यादीने आरोपीवर विश्वास ठेवून संबंधित खात्यावर २ लाख रुपये पाठवले. मात्र, त्यानंतर ना नफा मिळाला ना मूळ रक्कम परत करण्यात आली. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे धाव घेतली.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४), ३ (५) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००८ च्या कलम ६६ (डी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक घाडगे करत असून, सायबर गुन्हेगारांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!