पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी – युनूस खतीब
वाकड पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने चेन चोरीच्या गंभीर गुन्ह्याचा अवघ्या ४८ तासांत छडा लावत आरोपीला अटक केली आहे. या कारवाईत तब्बल ३ गुन्हे उघडकीस आले असून सुमारे ४.७७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक ८ एप्रिल २०२६ रोजी सकाळी गणेश मंदिर, शेरगाव परिसरात मॉर्निंग वॉक करत असलेल्या महिलेच्या गळ्यातील १२ ग्रॅम सोन्याचे गंठण एका अज्ञात इसमाने दुचाकीवरून येत जबरी हिसकावून नेले होते. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १७९/२०२६ दाखल करण्यात आला होता.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने घटनास्थळ व परिसरातील तब्बल १०० ते १७० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. या तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचा माग काढण्यात आला.
तपासादरम्यान सचिन मानसिंग चव्हाण (वय २७, रा. मान, पुणे) यास ताब्यात घेऊन दिनांक १० एप्रिल रोजी अटक करण्यात आली. चौकशीत आरोपीकडून आणखी दोन चेन चोरी व एक वाहन चोरीचा गुन्हा उघडकीस आला.
विशेष म्हणजे, आरोपी हा यापूर्वी पुणे शहर वाहतूक विभागात ट्रॅफिक वॉर्डन म्हणून कार्यरत होता. मात्र वर्तन चांगले नसल्याने त्याला पाच महिन्यांपूर्वी सेवेतून काढण्यात आले होते. त्यानंतर त्याने चोरीच्या गुन्ह्यांकडे वळत, चोरी केलेल्या होंडा अॅक्टिवा स्कूटरचा वापर चेन स्नॅचिंगसाठी केल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली होंडा युनिकॉर्न मोटारसायकल, होंडा अॅक्टिवा स्कूटर तसेच २३ ग्रॅम सोन्याचे दागिने असा एकूण ४.७७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलग व पोलीस निरीक्षक (गुन्हे) किशोर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून, नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.




