पिस्टल, गोळ्या, कोयता जप्त; ६ आरोपी अटकेत — जुना वैर ठरले कारण
पिंपरी-चिंचवड, प्रतिनिधी (युनूस खतीब)
खुनाच्या उद्देशाने अपहरण करण्यात आलेल्या युवकाची अवघ्या सहा तासांत सुटका करून उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत सहा आरोपींना अटक केली. या कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला असून शहरात खळबळ उडाली आहे.
दि. १२ एप्रिल रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास खेड तालुक्यातील वासुली येथे अमेझॉन कंपनीसमोरून ऋषीकेश ऊर्फ दादया दिलीप कल्हाटकर (रा. कोरेगाव बुद्रुक) याचे सागर जावळे व ओमकार चव्हाण यांनी साथीदारांसह जबरदस्तीने अपहरण केले. आरोपींनी महिंद्रा थार आणि आय-टेन या दोन चारचाकी वाहनांचा वापर केला होता. याबाबतची माहिती डायल ११२ वर मिळताच पोलीस यंत्रणा तात्काळ सतर्क झाली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तीन विशेष तपास पथके तयार करण्यात आली. तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी खेड येथील क्रीडा संकुल परिसरात असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी सापळा रचत दोन्ही गाड्या अडवल्या आणि झडतीदरम्यान अपहृत युवकास सुखरूप सोडवण्यात यश मिळवले.
या कारवाईत आरोपींकडून दोन गावठी पिस्टल, १० जिवंत काडतुसे, लोखंडी कोयता व चाकू जप्त करण्यात आले. पोलिसांनी सागर जावळे, नितीन थिटे, सौरभ ऊर्फ सोन्या ढोरे, अजय गोपाळे, कुणाल चव्हाण व ओमकार कोरडे यांना अटक केली आहे. इतर अल्पवयीन साथीदारांना बालन्याय मंडळासमोर हजर करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या प्रकरणामागे जुने वैमनस्य कारणीभूत असल्याचे समोर आले आहे. आरोपींचा मित्र शुभम काळे याच्या खुनाच्या प्रकरणात अपहृत युवकाचा चुलतभाऊ संदीप कल्हाटकर आरोपी असल्याने आणि त्याच्या जामिनासाठी ऋषीकेश प्रयत्न करत असल्यामुळे आरोपींमध्ये संताप होता. याच वैरातून अपहरण करून खून करण्याचा कट रचण्यात आला होता.
उत्तर महाळुंगे पोलिस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता २०२३ व आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहआयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अप्पर आयुक्त सारंग आवाड, बसवराज तेली, पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर व डॉ. शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी व त्यांच्या पथकाने बजावली.




