पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब
पिंपरी-चिंचवड शहरातील संत तुकारामनगर परिसरात पोलिसांनी धडक कारवाई करत बेकायदेशीर अग्नीशस्त्रांसह तिघांना अटक केल्याची मोठी कारवाई समोर आली आहे. या कारवाईत दोन देशी बनावटीची पिस्टल व जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, १२ एप्रिल २०२६ रोजी रात्री सुमारे ९.४५ वाजण्याच्या सुमारास एच.ए. मैदान परिसरात ही कारवाई करण्यात आली. पोलीस शिपाई ज्ञानेश्वर भुरे यांच्या फिर्यादीवरून ही गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दीपक बर्फे (रा. पिंपळे गुरव), अतुल भालेराव (रा. दापोडी) आणि मुकेश काची (रा. दापोडी) हे तिघे मिळून प्रतिबंधित कालावधीत बेकायदेशीररित्या अग्नीशस्त्रे बाळगत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
तपासात आरोपींकडून दोन देशी बनावटीची पिस्टल, दोन जिवंत काडतुसे तसेच एक यामाहा मोटारसायकल असा एकूण सुमारे १ लाख २ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, शहरात लागू असलेल्या आदेशानुसार या कालावधीत कोणत्याही प्रकारचे घातक शस्त्र बाळगण्यास बंदी असतानाही आरोपींनी नियमांचा भंग केला होता.
या प्रकरणी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता तसेच शस्त्र अधिनियम व महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करत आहेत.





Total Users : 213814