spot_img
spot_img
spot_img

दिघीत वेअरहाऊसमध्ये कोयत्याचा धाक; ‘महिन्याला हप्ता द्या’ म्हणत दहशत, दोघे अटकेत

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब

पिंपरी चिंचवड : दिघी परिसरात कोयत्याचा धाक दाखवत वेअरहाऊसमध्ये घुसून कामगारांना जीवे मारण्याची धमकी देत खंडणी उकळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

महाराष्ट्र पोलीस यांच्या माहितीनुसार, दि. ७ एप्रिल २०२६ रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास विजयनगर, दिघी येथील राघव मंगल कार्यालयाजवळ असलेल्या इन्स्टाकार्ट सर्व्हिस प्रा. लि. या वेअरहाऊसमध्ये हा प्रकार घडला.

फिर्यादी हर्षद अख्ण आहेर (वय २५, रा. खराडी) यांच्या तक्रारीवरून दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १६१/२०२६ नोंद करण्यात आला आहे.

आरोपी सोहेल अलिशेर मिर्झा (वय २३) आणि साकीर हुसेन आषिश चिट्टपरम (वय २३) हे मोटारसायकलवरून येत हातात लोखंडी कोयता घेऊन वेअरहाऊसमध्ये जबरदस्तीने शिरले. त्यांनी फिर्यादी व कामगारांना शिवीगाळ करत दमदाटी केली.

“कंपनी चालवायची असेल तर महिन्याला १० हजार रुपये हप्ता द्यावा लागेल, नाहीतर एकेकाला कापून टाकू… आम्ही दिघीचे भाई आहोत,” अशी धमकी देत आरोपींनी कोयता उगारून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच कोणी पोलिसात तक्रार केल्यास जिवंत सोडणार नाही, असा इशाराही दिला.

दरम्यान, आरोपींनी वेअरहाऊसमध्ये तसेच बाहेर उभ्या असलेल्या मोटारसायकलींवर कोयत्याने वार करून नुकसान केले व परिसरात दहशत निर्माण केली.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम ३०८(३), ३०८(४), ३३२, ३३३, ३२४(४), ३(५) तसेच क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अ‍ॅक्ट कलम ७, भारतीय हत्यार कायदा कलम ४(२५) आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१)(३) सह १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस उपनिरीक्षक जगताप पुढील तपास करत असून, दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. परिसरातील व्यावसायिकांमध्ये या घटनेमुळे भीतीचे वातावरण असून पोलिसांनी गस्त वाढवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!