पिंपरी चिंचवड प्रतिनिधी | युनूस खतीब
पिंपरी चिंचवड : नवीन ऑटो रिक्षा देण्याचे आमिष दाखवत एक लाखाहून अधिक रकमेची फसवणूक केल्याचा प्रकार हिंजवडी परिसरात उघडकीस आला असून, बनावट पावती देत आरोपीने विश्वासघात केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे रिक्षाचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
महाराष्ट्र पोलीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २१२/२०२६ नोंद करण्यात आला आहे. हा प्रकार दि. १० फेब्रुवारी २०२५ ते ८ एप्रिल २०२६ या कालावधीत वाकड येथील रिदम ऑटो, विनोदे वस्ती परिसरात घडला.
फिर्यादी विकास अभिमन्यु वाघमारे (वय ४३, व्यवसाय ड्रायव्हर, रा. थेरगाव) यांना आरोपी किशोर उर्फ सचिन सुधाकर बागडे (रा. लोहगाव) याने नवीन अल्टो ऑटो रिक्षा मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी ५ हजार रुपये बुकिंग रक्कम व १ लाख रुपये रोख घेतले.
यानंतर आरोपीने वाकड येथील ‘रिदम ऑटो’ शोरूमची बनावट पावती देत फिर्यादीची दिशाभूल केली. पुढे कोणतेही वैध कागदपत्र नसलेली (परमिट, नंबर, विमा नसलेली) ऑटो रिक्षा देण्यात आली. याबाबत फिर्यादींनी आक्षेप घेतल्यानंतर ती रिक्षा दापोडी येथील शोरूममध्ये जमा करून घेण्यात आली.
मात्र, आजतागायत भरलेली १,०५,००० रुपयांची रक्कम परत करण्यात आलेली नाही. यामुळे आरोपीने फिर्यादीसह संबंधित शोरूमचीही फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम ३१६(२), ३१८(४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी सध्या फरार आहे.
पोलीस उपनिरीक्षक ताकतोडे पुढील तपास करत असून, आरोपीचा शोध सुरू आहे. नागरिकांनी अशा व्यवहारांमध्ये अधिकृत कागदपत्रांची खातरजमा करूनच आर्थिक व्यवहार करावेत, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.




