शबनम न्यूज | प्रतिनिधी
शहराच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारा धक्कादायक आरोप समोर आला आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत तब्बल ५२ कोटी रुपयांचा आर्थिक घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी केला आहे. या प्रकरणामुळे महापालिका प्रशासनाच्या पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना बारणे यांनी मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन यांच्यावर थेट आरोप करत म्हटले की, ठेकेदारांशी संगनमत करून आणि सर्व प्रशासकीय नियम धाब्यावर बसवत कोट्यवधी रुपयांची बिले रात्रीतून काढण्यात आली. विशेष म्हणजे, या बिलांसाठी २०२६-२७ च्या मंजूर अंदाजपत्रकात कोणतीही तरतूद नसताना सुमारे ७० हून अधिक कामांची देयके अदा करण्यात आली.
या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे संबंधित विभागप्रमुखांनाही या प्रक्रियेची कल्पना नसल्याचे समोर आले आहे. स्थापत्य आणि पाणीपुरवठा विभागाशी संबंधित कामे असूनही, विभागीय स्तरावर कोणतीही माहिती न देता थेट आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप आहे.
‘बोगस’ उपसूचना आणि नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्यांचा गैरवापर?
या कथित घोटाळ्यासाठी ‘बोगस’ उपसूचनांचा आधार घेतल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सुमारे २० पेक्षा अधिक नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्यांचा वापर करून ७० कामांना मंजुरी मिळवण्यात आली. यामध्ये विविध पक्षांच्या नगरसेवकांचा समावेश असून, संबंधितांनी आपल्या प्रभागातील कामांसाठी स्वाक्षऱ्या केल्याचे मान्य केले, मात्र संपूर्ण प्रक्रियेबाबत अनभिज्ञ असल्याचे स्पष्ट केले.
प्रशासनाचा बचाव, आरोप फेटाळले
दरम्यान, मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन यांनी सर्व आरोप फेटाळून लावत स्पष्टीकरण दिले. “उपसूचनांमध्ये कोणतीही अनियमितता झालेली नाही. सर्व कामे संबंधित विभागांकडूनच प्रस्तावित होती. अंदाजपत्रकात तरतूद असते आणि लोकप्रतिनिधींच्या स्वाक्षऱ्या असल्यामुळे बिले मंजूर करणे नियमाप्रमाणेच झाले,” असे त्यांनी सांगितले. बैठकीला अनुपस्थित राहण्यामागे आयुक्तांसोबतची बैठक कारणीभूत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
‘थेट दरोडा’ – फौजदारी कारवाईची मागणी
अभिषेक बारणे यांनी या संपूर्ण प्रकाराला “महापालिकेच्या तिजोरीवर टाकलेला थेट दरोडा” असे संबोधत प्रवीण जैन यांच्यावर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करून निलंबनाची मागणी केली आहे. “कारवाई होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही,” असा इशाराही त्यांनी दिला.
आता या गंभीर आरोपांवर महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी काय भूमिका घेतात, आणि या प्रकरणाची चौकशी कोणत्या पातळीवर होते, याकडे संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहराचे लक्ष लागले आहे.




Total Users : 239658