तळेगाव दाभाडे परिसरातील घटना; मुख्य आरोपीसह तिघे वेटर फरार
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी – युनूस खतीब
मावळ तालुक्यातील गहुंजे परिसरात केवळ १०० रुपयांच्या किरकोळ वादातून रिक्षाचालकावर बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाले असून त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे.
याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १०५/२०२६ नोंद करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता कलम ११८(२) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ४ एप्रिल २०२६ रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास साईनगर, गहुंजे येथील मावळ गेट हॉटेलमध्ये घडली. फिर्यादी अमित आनंद पोटगुळे (वय ४५, रा. मामुर्डी) हे रिक्षाचालक आहेत.
फिर्यादी यांनी हॉटेलमध्ये घेतलेल्या बिअरचे १०० रुपये ‘उद्या देतो’ असे सांगितल्यावरून आरोपी किरण गोरख ठोबरे आणि हॉटेलमधील तीन वेटर यांनी संतापून त्यांच्यावर हल्ला चढवला. आरोपींनी लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली.
या मारहाणीत फिर्यादी यांच्या हनुवटीला खुर्ची आदळून जखम झाली, तर उजव्या डोळ्याला जबर मार लागून डोळा सुजला आहे. याशिवाय जबडा, छाती आणि उजव्या पायावर गंभीर दुखापत झाली असून पायातील हाड फ्रॅक्चर झाल्याचे समोर आले आहे.
घटनेनंतर आरोपी फरार झाले असून अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण करत आहेत.




