‘३ लाखांचा सौदा’ ठरला फसवा! खेळण्याच्या नोटांनी कार लंपास
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी – युनूस खतीब
चाकण परिसरात कार खरेदीच्या बहाण्याने खेळण्याच्या नोटांचा वापर करून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून उत्तर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ एप्रिल २०२६ रोजी पहाटे माणिक चौक ते शिक्रापूर रोड परिसरात ही घटना घडली. फिर्यादी हुजेब फिरोज बागवान (वय २६, रा. बारामती) हे स्क्रॅप व्यवसाय करतात. त्यांनी आपली आल्टो (MH 42 AX 5880) कार विक्रीसाठी ठेवली होती.
आरोपी गणेश ज्ञानदेव ढाकरे (वय २१) आणि समीर दिनकर म्हल्ले (वय २६) यांनी कार खरेदी करण्याचे सांगून ३ लाख रुपये देण्याचे मान्य केले. त्यापैकी ३ लाख रुपये तत्काळ देतो आणि उर्वरित ५० हजार रुपये नंतर देऊ, असे सांगून त्यांनी विश्वास संपादन केला.
यानंतर ‘गाडीची पूजा करायची आहे’ असे सांगत आरोपींनी कार ताब्यात घेतली. फिर्यादीने पैसे मोजताना धक्कादायक बाब उघडकीस आली. बंडलमध्ये फक्त तीनच खऱ्या नोटा असून उर्वरित सर्व नोटा या खेळण्यातील बनावट असल्याचे समजले.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने आरोपींना फोन केला; मात्र त्यांचा मोबाईल बंद लागला. त्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.
पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक केली आहे. भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ३१८(४) व ३(५) प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार ढमढेरे करत आहेत.
सावध राहण्याचे आवाहन
या घटनेमुळे वाहन खरेदी-विक्री व्यवहार करताना रोख रक्कम तपासूनच व्यवहार करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.




