पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी – युनूस खतीब
चाकण परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली असून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत रोख रक्कम व जुगार साहित्य जप्त करण्यात आले असून आरोपी सध्या फरार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ३ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास शेल पिंपळगाव कृषी मार्केटसमोर, शुभदा हॉटेलशेजारील आदित्य ऑटो गॅरेजमध्ये काही जण बेकायदेशीररित्या ‘कल्याण’, ‘मुंबई’ आणि ‘मिलन’ नावाच्या मटका जुगाराचा व्यवसाय चालवत असल्याची माहिती चाकण उत्तर पोलिसांना मिळाली होती.
या माहितीनुसार पोलिसांनी छापा टाकला असता आरोपी नागनाथ चाटे, विश्वास ओव्हाळ व राहुल वानखेडे हे तिघे जण जुगाराचे साहित्य व रोख रक्कम बाळगून नागरिकांकडून मटका खेळवताना आढळून आले. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून एकूण ११,३१५ रुपये रोख तसेच जुगारासाठी वापरले जाणारे साहित्य जप्त केले.
या प्रकरणी चाकण उत्तर पोलीस ठाण्यात मुंबई जुगार कायदा कलम १२ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईदरम्यान आरोपी घटनास्थळावरून पसार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे. पुढील तपास पोलीस हवालदार आहेरकर करत आहेत.
दरम्यान, परिसरात सुरू असलेल्या अशा बेकायदेशीर जुगार अड्ड्यांवर पोलिसांकडून सतत कारवाई केली जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.




