spot_img
spot_img
spot_img

बालेवाडी हायवेवर भरधाव दुचाकीची धडक; एकाचा मृत्यू, डिलिव्हरी बॉय जखमी

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी – युनूस खतीब

बाणेर-बालेवाडी परिसरातील मुंबई-बेंगळुरू महामार्गावर भरधाव वेगातील दुचाकीने मागून दिलेल्या धडकेत भीषण अपघात होऊन एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात डिलिव्हरी बॉयसह आणखी एक जण जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हर्षवर्धन विनोद उसनाळे (वय २५, रा. भोसरी) हे ४ एप्रिल २०२६ रोजी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मोटारसायकलवरून बालेवाडी स्टेडियम परिसरातून जात होते. यावेळी राजवाडा गेटपासून सुमारे १०० मीटर अंतरावर, मुंबई लेनवर त्यांच्या दुचाकीला मागून भरधाव वेगात येणाऱ्या दुसऱ्या मोटारसायकलने जोरदार धडक दिली.

एमएच १९/सीएल ०७०० क्रमांकाच्या दुचाकीवरील चालक हर्षवर्धन सुनिल यादव (वय २५, मूळ रा. छत्तीसगड) हा आपल्या मोटारसायकलवर मागे एक व्यक्ती बसवून अतिवेगाने वाहन चालवत होता. नियंत्रण सुटल्याने त्याने उसनाळे यांच्या दुचाकीला मागून धडक दिली.

या अपघातात फिर्यादी उसनाळे यांच्या डोक्याला, डाव्या हाताला व पायाला किरकोळ दुखापत झाली. तर आरोपीच्या दुचाकीवर मागे बसलेल्या व्यक्तीच्या चेहऱ्याला व उजव्या हाताला गंभीर मार लागला. अपघातात स्वतः चालक हर्षवर्धन यादव याच्या डोक्याला व शरीरावर गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला.

या घटनेमुळे दोन्ही मोटारसायकलींचे मोठे नुकसान झाले आहे. प्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम २८१, १०६(१), १२५ (अ)(ब), ३२४(४) तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम ११९/१७७, १८४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ठाकरे करत असून, अतिवेग व बेदरकार वाहनचालना हीच अपघाताची प्रमुख कारणे असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!