आईकडे पाहिल्याच्या संशयातून वाद; आरोपीला पोलिसांकडून अटक
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी – युनूस खतीब
चिंचवडमधील बिजलीनगर परिसरात क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून एका व्यक्तीवर लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात भंगार गोळा करणारा कामगार गंभीर जखमी झाला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संतोष जालींदर रणवरे (वय ४०, रा. बौद्धनगर, निगडी) हे ३ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास बिजलीनगर परिसरात भंगार गोळा करत होते. यावेळी ते आरोपी भरत किशोर दोलारामन यांच्या घरासमोर आले असता आरोपीची आई रेखा दोलारामन यांनी “काय पाहतोस?” असा जाब विचारला.
त्यावर फिर्यादी यांनी आपण कुणाकडे पाहत नसल्याचे सांगितले. मात्र, याच कारणावरून आरोपी भरत दोलारामन संतापला आणि “माझ्या आईकडे पाहतोस का?” असा आरोप करत फिर्यादीस शिवीगाळ व धक्काबुक्की केली.
वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपीने लोखंडी रॉडने फिर्यादीवर हल्ला चढवला. या हल्ल्यात फिर्यादीच्या दोन्ही पायांच्या गुडघ्याजवळ, डाव्या हाताच्या खांद्याजवळ, हाताच्या बोटांना तसेच डोक्याच्या डाव्या बाजूस गंभीर मार लागला आहे.
या प्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(२) व ३५२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक झिंजुर्डे करत आहेत.




